पैठणगेट हत्याप्रकरण : दुकानासमोर उभे राहण्यावरून वाद; तडजोडीनंतरही भररस्त्यात संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:09 IST2025-11-12T14:07:17+5:302025-11-12T14:09:18+5:30
गुन्हे शाखेने पहाटे ५ वाजेपर्यंत मुख्य हल्लेखोर परवेजसह मदत करणाऱ्या काका, भावांच्या आवळल्या मुसक्या; १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

पैठणगेट हत्याप्रकरण : दुकानासमोर उभे राहण्यावरून वाद; तडजोडीनंतरही भररस्त्यात संपवलं
छत्रपती संभाजीनगर : मोबाइल दुकानासमोरच उभी राहणारी अंडाभुर्जीची गाडी. तेथे रोज येऊन उभे राहणाऱ्या ग्राहकांवरून दुकानचालक परवेज शेख मेहबुब (३६, रा. सब्जीमंडी) याचे इतरांसोबत खटके उडत होते. त्यात मृत इम्रान अकबर कुरेशी (३३, रा. सिल्लेखाना) यांच्यासोबतही परवेजचे दोन वेळेस वाद झाले. ८ नोव्हेंबर रोजी भांडणात तडजोड होऊनही १० नोव्हेंबर रोजी वाद टोकाला गेला. इम्रान यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. मंगळवारी इम्रान यांच्या पार्थिवावर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
इम्रान अनेकदा पैठणगेट येथील सलीम शरीफ शेख यांच्या दुकानासमोरील अंडाभुर्जीच्या गाडीवर जात हाेते. वरचेवर तेथे जाऊन उभे राहत असल्याने त्यांचा व मोबाइल दुकानदारांचा वाद होत होता. ८ नोव्हेंबर रोजी स्थानिक कलीम कुरेशी यांनी मध्यस्ती करीत वाद मिटवला होता. १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील बॉम्बस्फोटप्रकरणी शहरात हाय अलर्ट जारी झाल्याने सोमवारी शहरात गस्त सुरू झाली होती. क्रांती चौक पोलिस पैठण गेट परिसरात गस्त घालत होते. त्याच वेळी इम्रान अंडाभुर्जीच्या गाडीवर उभे होते. तेव्हा त्यांचा चुलत भाऊ इब्राहिम व भावोजी हारुण उस्मान कुरेशीदेखील तेथे होते. त्याच वेळी परवेज शेखने त्यांना पाहून शिवीगाळ केली. वाद वाढताच दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. जवळपास साडेतीन मिनिटे हल्लेखोर परवेज इम्रान यांच्यावर वार करीत होते. यात इम्रान यांचा रुग्णालयात नेईपर्यंत मृत्यू झाला.
रक्तबंबाळ अवस्थेत फिरत होता हल्लेखोर
हत्येनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हत्या करणारा परवेझ तत्काळ पसार झाला. त्याला पळण्यासाठी त्याचेे भाऊ व चुलत्यांनी मदत केली. ही बाब कळताच शेख खय्युम शरीफ शेख, शेख सलीम शेख शरीफ व शेख फैजल शेख नजीम यांनी त्याला शहराबाहेर पळवून नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांना ही बाब कळताच त्यांनी धाव घेतली. सुरुवातीला संपूर्ण शरीर, कपड्यांना रक्त लागलेल्या अवस्थेतच पळत असलेल्या परवेजला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या इतर तिघांना पहाटे ५ पर्यंत ताब्यात घेतले. पोलिस निरीक्षक पवन चौधरी यांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या सर्वांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दिवसभर कडेकोट बंदोबस्त
मंगळवारीदेखील परिसरात तणाव कायम होता. रात्रीपासून दंगा काबू पथक तैनात करण्यात आले होते. अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी ठाण मांडून होते. सायंकाळी ५ वाजता इम्रान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान काही संतप्त तरुणांकडून दोन दुकानांवर दगडफेक करण्यात आली. तर रस्त्यात उभ्या सात ते आठ दुचाकींची तोडफोड करण्यात आली. दंगा काबू पथकाच्या जवानांनी धाव घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
मोबाइल मार्केट दिवसभर बंद
हत्येत मोबाइल दुकानदारच मुख्य आरोपी असल्याने मंगळवारी मोबाइल दुकानांवर राग व्यक्त होण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे मंगळवारी पैठण गेट परिसरातील संपूर्ण मोबाइलची दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सायंकाळी ६ वाजता पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या नेतृत्वात परिसरात मार्च काढण्यात आला.