पाडसवान हत्याकांड: हत्येसाठी वापरलेला दांडा निमोणे बंधूंनी खास उज्जैनहून आणला होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 19:40 IST2025-08-30T19:39:31+5:302025-08-30T19:40:05+5:30
घटनेनंतर पहिल्यांदाच त्याला तेथे नेल्याने जमाव संतप्त होण्याच्या शक्यतेने कडेकोट बंदोबस्त तैनात होता.

पाडसवान हत्याकांड: हत्येसाठी वापरलेला दांडा निमोणे बंधूंनी खास उज्जैनहून आणला होता
छत्रपती संभाजीनगर : संभाजी कॉलनीतील प्रमोद पाडसवान यांच्या हत्येत निमोणे भावांनी वापरलेला दांडा हत्येनंतर समोरील गोठ्यात लपवला होता. शुक्रवारी तपास पथकाने हल्लेखोर ज्ञानेश्वर निमोणे याच्या उपस्थितीत तो दांडा जप्त करत पंचनामा केला. घटनेनंतर पहिल्यांदाच त्याला तेथे नेल्याने जमाव संतप्त होण्याच्या शक्यतेने कडेकोट बंदोबस्त तैनात होता.
सध्या पोलिस कोठडीत असलेले आरोपी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोणे, त्याची आई शशिकला व लहान भाऊ गौरव, सौरभ, जावई मनोज, वडील काशीनाथ या सर्वांची शनिवारी पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. दुपारी पुन्हा त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाईल. दरम्यान, हत्येत वापरलेला एक दांडा जप्त करणे बाकी होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुदळे यांच्यासह कडेकोट बंदोबस्तात ज्ञानेश्वरला त्याच्या घरी नेण्यात आले. काही महिन्यांपूर्वी त्याने उज्जैनहून लाकडी दांडा आणला होता. त्यानेच प्रमोद व त्यांच्या वडिलांच्या डोक्यात जबर घाव घालण्यात आले. पथकाने तो जप्त केला. त्याला पाहण्यासाठी यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती.
प्रकाश आंबेडकर यांनी घेतली पाडसवान कुटुंबाची भेट
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पाडसवान कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. घटना समजून घेत कायदेशीर सल्लामसलत करत आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.