मराठवाडा साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
By Admin | Updated: April 4, 2016 00:35 IST2016-04-04T00:21:08+5:302016-04-04T00:35:33+5:30
जालना : मराठवाडा साहित्य परिषदेचे ३७ वे मराठवाडा साहित्य संमेलन जालना शहरातील श्री गुरुगणेश साहित्यनगरीत ९ व १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची

मराठवाडा साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
जालना : मराठवाडा साहित्य परिषदेचे ३७ वे मराठवाडा साहित्य संमेलन जालना शहरातील श्री गुरुगणेश साहित्यनगरीत ९ व १० एप्रिल रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष विनयकुमार कोठारी यांनी पत्रपरिषदेत दिली.
या दोन दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, तीन परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन, विशेष सत्कार, प्रकट मुलाखत, कवी कट्टा, बालमेळावा आदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
श्रीगुरुगणेश साहित्यनगरीत नऊ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता ग्रंथ दिंडी व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुख्य उद्घाटन सोहळा गुरुगणेश व्यासपीठावर सकाळी १० वाजता होईल. संमेलनाध्यक्ष नाटककार दत्ता भगत, लक्ष्मीकांत देशमुख, कवी ना. धो. महानोर यांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, आ. अर्जुन खोतकर, उद्योजक घनश्याम गोयल, शांतीलाल पित्ती, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुदेश सकलेचा यांची उपस्थिती राहणार आहे.
या संमेलनात पद्मभूषण बद्रीनारायण बारवाले, समीक्षक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे, क्रीडापटू विजय झोल यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी रविवारी कवी भ. मा. परसवाळ यांची प्रकट मुलाखत डॉ. संजीवनी तडेगावकर, प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर हे घेतील. १०.३० ते १२.३० प्रा. ऋषिकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी कवितेला मराठवाड्यातील कवींचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल. यात प्रा. डॉ. पी. विठ्ठल, प्रा. डॉ. केशव देशमुख, प्रा. डॉ. शशिकांत पाटील, प्रा. डॉ. केशव तुपे, प्रा. डॉ. कल्पना जाधव, प्रा. भाऊसाहेब राठोड यांचा सहभाग राहील. दु. १२.३० वाजता प्राचार्य भगवान देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होईल. यात राम निकम, सत्यशिला तौर, विठ्ठल बोकन, स्वाती कानेगावकर, अंबादास केदार, भास्कर बढे यांचा सहभाग राहील. दुपारी २.३० ते ४.३० दरम्यान प्रा. भगवंत क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ‘आराजकतेच्या काळात संत साहित्य हेच खरे उत्तर आहे’ यावर परिसंवाद होणार असून त्यात प्रा. डॉ. विद्यासागर पाटंगणकर, प्रा. पंढरीनाथ धोंडगे, मार्तंड कुलकर्णी, प्रा. भगवान काळे, सय्यद जब्बार पटेल, प्रा. डॉ. हंसराज जाधव यांचा सहभाग राहिल. संमेलनात महंदबा व्यासपीठावर कवि फ. म. शहाजिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवि संमेलन होणार आहे.
दु.२ वा. विजयअण्णा बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राची अवकळा, नोकरशहा आणि मराठी राजकारणी’ यावर परिसंवाद होईल. ४ वाजता नाट्यांजलीचा भरतनाट्यम कार्यक्रम, सायं. ६ वाजता ‘आकडा’ नाटक, ८ ते १० दरम्यान कवि संमेलन, सायंकाळी समारोप बाबा भांड यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी डॉ. संजीवनी तडेगावकर, ज्येष्ठ कवी प्रा. जयराम खेडेकर, अनया अग्रवाल, पवन जोशी आदी उपस्थित होते.