अवयवदानामुळे जीवदान; दोन्ही किडन्यांचे छत्रपती संभाजीनगरात प्रत्यारोपण, यकृत नागपूरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:08 IST2025-08-09T12:08:39+5:302025-08-09T12:08:59+5:30
६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे तीन रुग्णांना जीवदान

अवयवदानामुळे जीवदान; दोन्ही किडन्यांचे छत्रपती संभाजीनगरात प्रत्यारोपण, यकृत नागपूरला
छत्रपती संभाजीनगर : इचलकरंजीहून पाच वर्षांपूर्वी शहरात स्थायिक झालेल्या ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे तीन रुग्णांना जीवदान मिळाले. दोन किडन्या शहरातील दोन रुग्णांना, तर लिव्हर नागपूरच्या रुग्णाला देण्यात आले.
४ ऑगस्ट २०२५ रोजी किशोर राठी हे शहानूरमियाँ दर्गा परिसरातून जात होते. अचानक चक्कर आल्याने दुचाकी घसरून ते पडले. स्थानिक व नातेवाइकांनी त्यांना कमलनयन बजाज रुग्णालयात दाखल केले. मात्र, मेंदूला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले होते. याच वेळी शहरातील दोन, तर नागपूरच्या एका रुग्णालयात अवयवांची गरज असल्याचे रुग्णालय प्रशासनाला समजले. ही बाब राठी यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आली. माणुसकीची भावना ठेवत राठी यांची पत्नी सुनीता व मुलांनी परवानगी दिली. त्यानंतर शहरातील दोन रुग्णालयांतील रुग्णांना प्रत्येकी एक किडनी, तर नागपूरच्या रुग्णालयातील रुग्णालयात यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले. कमलनयन बजाज रुग्णालयातील डॉ. ओसवाल आणि डॉ. शिवाजी तौर, डॉ. विनोद गोसावी, डॉ. गीता फेरवानी, डॉ. अजय रोटे, डॉ. मिलिंद वैष्णव आणि सीईओ डॉ. जॉर्ज फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले.
राठी यांच्या कुटुंबाच्या परवानगीनंतर रुग्णालयाच्या वतीने किशोर राठी यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.