विमा कंपनीस तक्रारदाराला उपचाराचा खर्च व्याजासह देण्याचा ग्राहक मंचचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 18:06 IST2018-11-07T18:05:44+5:302018-11-07T18:06:58+5:30
तक्रारदार विराणी यांनी २००६ मध्ये ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीची वैद्यकीय विमा पॉलिसी घेतली होती.

विमा कंपनीस तक्रारदाराला उपचाराचा खर्च व्याजासह देण्याचा ग्राहक मंचचा आदेश
औरंगाबाद : तक्रारदार सुलतान अकबर अली विराणी यांना उपचाराचा खर्च १ नोव्हेंबर २०१६ पासून १० टक्के व्याजासह देण्याचा आदेश औरंगाबाद ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा एस. बी. कुलकर्णी, सदस्य संध्या बारलिंगे व किरण ठोले यांनी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. तक्रारदाराला झालेल्या मानसिक त्रासापोटी २० हजार रुपये देण्याचेही मंचने आदेशात म्हटले आहे.
तक्रारदार विराणी यांनी २००६ मध्ये ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीची वैद्यकीय विमा पॉलिसी घेतली होती. त्यानंतर वेळोवेळी विम्याचे नूतनीकरण के ले होते. २०१६ मध्ये सुलतान विराणी यांना वैद्यकीय उपचाराची गरज पडली. त्यांनी प्रथम औरंगाबादेतील पेंडकर रुग्णालयात व त्यानंतर पुणे येथील अॅपेक्स व केईएम रुग्णालयात उपचार घेतले. उपचाराचा खर्च परत मिळावा यासाठी विराणी यांनी विमा कंपनीकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज केला. परंतु विमा कंपनीने उपचाराचा खर्च परत केला नाही. अनेक वेळा पाठपुरावा केल्यानंतरही उपचाराचे पैसे न मिळाल्याने विराणी यांनी अॅड. योगेश सोमाणी यांच्यामार्फत ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती.
फिर्यादीला जन्मापासून आजार असल्याने उपचाराचा खर्च देण्यास कंपनी बांधील नसल्याचे विमा कंपनीतर्फे सांगण्यात आले. तर फिर्यादीने २००६ मध्ये विमा पॉलिसी घेतली. परंतु त्यांना २०१६ पर्यंत कधीच आजार झालेला नाही, त्यामुळे कंपनी उपचाराचा खर्च देण्यास बांधील असल्याचे फिर्यादीतर्फे सांगण्यात आले.