तंबाखूच्या व्यसनाने मुखाचा कर्करोग; २५ टक्के रुग्णांच्या जिभेची पुनर्निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:42 IST2025-05-31T17:39:10+5:302025-05-31T17:42:46+5:30
जागतिक तंबाखू विरोधी दिन विशेष:शासकीय कर्करोग रुग्णालयात अशा रुग्णांना शस्त्रक्रियेद्वारे नवी जीभ तयार करून दिली जात आहे.

तंबाखूच्या व्यसनाने मुखाचा कर्करोग; २५ टक्के रुग्णांच्या जिभेची पुनर्निर्मिती
छत्रपती संभाजीनगर : तंबाखूच्या व्यसनामुळे मुखाच्या कर्करोगाला सामोरे जावे लागते. मुख कॅन्सरने त्रस्त झालेल्या रुग्णांना अनेकदा जीभ काढावी लागते. त्यामुळे रुग्णास बोलणे, अन्न गिळणे या गोष्टी कठीण होतात. मात्र शासकीय कर्करोग रुग्णालयात अशा रुग्णांना शस्त्रक्रियेद्वारे नवी जीभ तयार करून दिली जात आहे. गेल्या वर्षभरात मुख कर्करोगाच्या २५ टक्के रुग्णांच्या जिभेची पुनर्निर्मिती करण्यात आली.
कर्करोग रुग्णालयातील कान-नाक-घसा विभागात गेल्या वर्षभरात ३७०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील बहुतांश रुग्णांना तंबाखू, सिगारेटच्या व्यसनामुळे कर्करोगाला सामोरे जावे लागले. जीभ काढून टाकल्यानंतर त्याच्या हाताच्या, मांडीच्या त्वचेपासून व स्नायूपेशींपासून नव्याने जीभ घडविली गेली. अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांच्यासह कर्करोग शल्य चिकित्साशास्त्र विभाग, कान-नाक-घसा विभाग, प्लास्टिक सर्जरीचे डाॅक्टर्स, परिचारिका, कर्मचारी रुग्णसेवेसाठी परिश्रम घेतात.
वर्षभरातील स्थिती
- कान-नाक-घसा विभागातील एकूण रुग्ण : ३,७००
- नवे रुग्ण : १२००
- वर्षभरात एकूण मोठ्या शस्त्रक्रिया : ८०
- जिभेची पुनर्निर्मिती : २० रुग्ण
पहिल्या, दुसऱ्या स्टेजमध्येच शक्य
पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधील मुख कर्करोगाचा रुग्ण असेल तरच जिभेची पुनर्रचना करता येते. ज्या रुग्णांना जिभेची अत्यावश्यकता असते, अशाच रुग्णांच्या जिभेची पुनर्रचना केली जाते.
- डॉ. अजय बोराळकर, कर्करोग शल्य चिकित्साशास्त्र विभाग, कर्करोग रुग्णालय
मायक्रोसर्जरीची मदत
जिभेची पुनर्रचना ही जिभेचे ट्यूमर काढल्यानंतर राहिलेल्या जिभेवर ठरते. उरलेली जीभ अर्ध्याहून जास्त असेल तर हातातून ज्याला ‘फ्री रेडियल फोरआर्म फ्लॅप’ म्हणतो, ते घेऊन जीभ तयार केली जाते. जर संपूर्ण जीभ काढावी लागली, तर मांडीमधून ‘फ्री एएलटी फ्लॅप’ घेतला जातो. या शस्त्रक्रियेमध्ये फ्लॅपमधील रक्तवाहिन्या मानेला असलेल्या रक्तवाहिन्यांशी मायक्रोसर्जरीच्या सहाय्याने जोडल्या जातात.
- डॉ. चैतन्य पाटील, प्लास्टिक सर्जन, कर्करोग रुग्णालय
अन्न गिळणे, बोलणे सुसह्य
जीभ तयार केल्यानंतर पूर्वीप्रमाणे स्पष्टपणे बोलता येत नाही. काही प्रमाणात बोलणे शक्य होते. शिवाय रुग्णाला अन्न गिळण्यासाठी नव्या जिभेची मदत होते. पूर्वी ४०-५० वर्षावरील मुखकर्करोगाचे रुग्ण येत, आता २८ वर्षाचा रुग्णही येतो. विभागप्रमुख डाॅ. सुनील देशमुख यांचे मार्गदर्शन मिळते.
- डॉ. वसंत पवार, कान-नाक- घसा विभाग, कर्करोग रुग्णालय