गंगापूर येथे कार आणि ट्रकच्या भीषण धडकेत एक ठार; दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 13:25 IST2020-03-13T13:23:46+5:302020-03-13T13:25:00+5:30
कार चारी बाजूने चेपली गेल्याने त्यात प्रवासी अडकले

गंगापूर येथे कार आणि ट्रकच्या भीषण धडकेत एक ठार; दोघे जखमी
गंगापुर : गंगापुर - वैजापूर मार्गावरील वरखेड पाटीजवळ कार व व ट्रक मध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.१३ ) पहाटे तीन वाजेदरम्यान हा अपघात झाला.
नाशिक जिल्ह्यातील अंदरसूल येथील सोनवणे कुटुंबीय कारमधून गंगापूरमार्गे अंदरसुलकडे जात असताना वरखेड पाटीजवळ ट्रक आणि कारची जोरदार धडक झाली. ट्रकच्या जोरदार धडकेत कार रस्त्याच्या खाली फेकली गेली. कार सर्व बाजूंनी चेपली गेल्याने त्यातील प्रवाशी राहुल सोनवणे, शितल सोनवणे, दत्तात्रय सोनवणे आत अडकून गंभीर जखमी झाले.
दरम्यान, या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी १०८ रुग्णवाहिकेस फोन करून बोलावलं. या ठिकाणी लोकांची गर्दी जमली होती मात्र यातील एकानेही मदत न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली. तोपर्यंत १०८ रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाली. रुग्नवाहिकेतील डॉक्टर लाहोटी चालक प्रवीण भालेराव यांनी अपघातग्रस्त कारमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले व तात्काळ गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचारादरम्यान राहुल सोनवणेचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेले शितल सोनवणे, दत्तात्रय सोनवणे या दोघावर प्रथमोपचार करून त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले.