नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी २६६ जणांची वीज तोडली, २८८ जणांचे मीटर काढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:42 IST2026-01-02T13:41:36+5:302026-01-02T13:42:03+5:30
थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे ‘मिशन नाइन्टी डेज'

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी २६६ जणांची वीज तोडली, २८८ जणांचे मीटर काढले
छत्रपती संभाजीनगर : थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची ‘मिशन नाइन्टी डेज' ही मोहीम महावितरणने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून सुरू केली आहे. आर्थिक वर्ष संपेपर्यंत आगामी ९० दिवस चालणाऱ्या या मोहिमेत वीज बिल वसुलीबरोबरच वीजचोरांवरही धडक कारवाई केली जाणार आहे. गुरुवारी दिवसभरात शहरातील २६६ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला, तर २८८ जणांचे मीटर काढून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
या मोहिमेत अभियंता आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांसह परिमंडळातील विविध कार्यालयांत कार्यरत अधिकारी व कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत. शहरातील शहागंज उपविभागात गुरुवारी शहागंजसह क्रांती चौक व पॉवर उपविभाग, छावणी उपविभागात छावणी, वाळूज व गारखेडा उपविभाग आणि चिकलठाणा उपविभागात सातारा, चिकलठाण्यासह सिडको उपविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली.
मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे यांनीही मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. चिकलठाणा व शहागंज उपविभागातील काही थकबाकीदारांचा वीजपुरवठा त्यांच्या उपस्थितीत कायमस्वरूपी खंडित करण्यात आला.