बापरे! शहराशेजारचे डोंगर चोरीला; माफियांच्या प्रतापाने पर्यावरणावर मोठा घाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 19:20 IST2025-02-18T19:19:32+5:302025-02-18T19:20:39+5:30
पर्यावरणासह सुरक्षेच्या दृष्टीने हे डोंगर अतिशय महत्त्वाचे होते.

बापरे! शहराशेजारचे डोंगर चोरीला; माफियांच्या प्रतापाने पर्यावरणावर मोठा घाव
- शेख मुनीर
छत्रपती संभाजीनगर : शहराच्या चारही बाजूंनी शासकीय मालकीचे डोंगर पोखरण्यात येत आहेत. अगोदरच रस्त्यांसाठी डोंगराची कत्तल करण्यात आलेली असतानाच आता गौण खनिज माफियांचा सगळीकडे सुळसुळाट झाला आहे. किरकोळ रक्कम भरून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची तस्करी करण्यात येत आहे. गौण खनिजाचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आतमध्ये असलेला खडकही फोडून त्यापासून बांधकामासाठी लागणारी कच (क्रश सेंट) तयार करून विकण्यात येत आहे. हा सर्व व्यवसाय शासन, प्रशासन आणि माफियांच्या संगनमताने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर वसवितानाच चारही बाजूंनी डोंगर असल्याचे निवडण्यात आले होते. त्यामुळे पर्यावरणासह सुरक्षेच्या दृष्टीने हे डोंगर अतिशय महत्त्वाचे होते. या डोंगररांगामध्ये वेरूळच्या लेणी, विद्यापीठ लेणी, दौलताबाद किल्ला उभारण्यात आलेला आहे. या डोंगरांमधून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नहरींचे जाळे विणण्यात आले होते. मात्र, आता हेच डोंगर संपूर्णपणे नष्ट होत चालले आहेत. याची खंत ना प्रशासला वाटते, ना राजकीय नेत्यांना. सर्वांची मिलिभगत असून, त्यातून गौण खनिज माफियांचा उदय झाला आहे.
शहराचे पर्यावरण धोक्यात
शहरातील पर्यावरणप्रेमींनी बैठक घेऊन डोंगर पोखरण्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही काळ काम थांबले होते. आपल्या शहराची डोंगर संस्कृती (हील इकॉलॉजी) नष्ट होत आहे. आधीच समृद्धी मार्ग, धुळे-सोलापूर, अजिंठा रस्त्यासाठी डोंगर फोडलेले आहेत. आता राजकारण्याचे नातेवाईक चारही बाजूंनी डोंगर गौण खनिजासाठी पोखरत आहेत. याकडे जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष आहे. गौण खनिज माफिया आणि प्रशासनाची मिलीभगत असल्यामुळे हा प्रकार वाढतच आहे. या प्रकारामुळे शहराचे पर्यावरण धोक्यात आले आहे.
- किशोर पाठक, पर्यावरणाचे अभ्यासक