महिला अंमलदाराला आक्षेपार्ह मेसेज, पुरस्कारप्राप्त पोलिस निरीक्षकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:35 IST2025-05-02T11:31:14+5:302025-05-02T11:35:01+5:30
तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल

महिला अंमलदाराला आक्षेपार्ह मेसेज, पुरस्कारप्राप्त पोलिस निरीक्षकांवर गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : पोलिस मुख्यालयातील एका महिला अंमलदाराला आक्षेपार्ह मेसेज केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर हा प्रकार द्वेषभावना किंवा गैरसमजातून घडला आहे. चौकशीला सामोरे जाणार असल्याची बाजू भंडारे यांनी मांडली.
३४ वर्षीय महिला अंमलदाराने याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यांच्या आरोपानुसार, ९ एप्रिलला रात्री १० वाजता त्यांना व्हॉट्स ॲपवर अज्ञात क्रमांकावरून कॉल आला व एक फोटो आला. सदर फोटो भंडारे यांनी लगेच डिलिट केला. अंमलदाराने क्रमांक कोणाचा आहे, याबाबत विचारणा केली असता भंडारे यांनी आक्षेपार्ह मेसेज केला. त्यावर भंडारे यांनी पुन्हा छायाचित्र पाठवून आक्षेपार्ह मेसेज केला. भंडारे माझे प्रभारी नसताना त्यांनी मला रात्री उशिरा कॉल, मेसेज करून छायाचित्र पाठवत मनास लज्जा वाटेल, असे कृत्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. सोमवारीच त्यांना पोलिस महासंचालकांचा उत्कृष्ट सेवा व उल्लेखनीय कार्यासाठी सन्मानचिन्ह जाहीर झाले होते.
मी निर्दोष, चौकशीला सामोरे जाणार
माझ्याकडून असा कुठलाही प्रकार झालेला नाही. हे सर्व आरोप खोटे आहेत. सदर गुन्हा द्वेष भावना किंवा गैरसमजातून दाखल करण्यात आला आहे. हे पोलिस तपासात समोर येईलच. मी याबाबतच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.
- अशोक भंडारे, पोलिस निरीक्षक.