आता छत्रपती संभाजीनगर बाहेरील अतिक्रमणावर हातोडा; दौलताबाद ते वेरूळ मार्गावर मार्किंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:52 IST2025-07-18T14:51:47+5:302025-07-18T14:52:52+5:30
दौलताबाद, कागजीपूरा येथे मार्किंग करते वेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली

आता छत्रपती संभाजीनगर बाहेरील अतिक्रमणावर हातोडा; दौलताबाद ते वेरूळ मार्गावर मार्किंग
खुलताबाद ( छत्रपती संभाजीनगर) : दौलताबाद ते वेरूळ पर्यंत महामार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी गुरूवारी दुपारी दौलताबाद व कागजीपूरा येथे मार्किंग करण्यात आले मार्किंग करते वेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशान्वये धार्मिक व पर्यटनस्थळ असलेल्या अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून दुकाने थाटली असल्याने यामुळे वाहतुकीसाठी व रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील अतिक्रमण मोठ्या काढण्यात येत असल्याने आता छत्रपती संभाजीनगर विकास प्राधिकरण हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन सरसावले असून दौलताबाद टी पॉईंट ते वेरूळ दरम्यान महामार्गावर असलेले अतिक्रमण येत्या काही दिवसात काढण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने गुरूवारी दौलताबाद टी पॉईंट ते कागजीपूरापर्यंत मार्किंग प्रशासनाने आखून दिले आहे. या मार्किंग मध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले दिसून येत आहे. दरम्यान अतिक्रमण काढण्यासाठी मार्किंग करण्यात येत होती त्यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रशासनाने मार्किंग झाल्यानंतर दुकानदारांनी स्वत: हून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले आहे.
दौलताबाद टी पॉईंट ते वेरूळ या मार्गावर मोठ मोठी हॉटेल्स, लॉजिंग व दुकानें असून अतिक्रमण काढण्यात येणार असल्याने दुकानदारांची धाकधूक वाढली आहे. दौलताबाद व वेरूळ, कागजीपूरा, खुलताबाद या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर अतिक्रमण झालेले असल्याचे एकंदरीत चित्र असल्याने सदरील अतिक्रमण किती फुटापर्यंत काढण्यात येईल या विषयी चर्चा हॉटेल व्यावसायिकात सुरू आहे.