आता पर्मनंट लायसन्सच्या ‘टेस्ट’वर राहील ‘सेन्सर’ची नजर; अशी असेल नवीन चाचणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:33 IST2025-08-21T19:31:02+5:302025-08-21T19:33:11+5:30
ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक होणार, निविदा प्रक्रिया सुरू

आता पर्मनंट लायसन्सच्या ‘टेस्ट’वर राहील ‘सेन्सर’ची नजर; अशी असेल नवीन चाचणी?
छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात पर्मनंट लायसन्सची चाचणी काहीशी कठीण होणार आहे. एखाद्या छोट्या चुकीमुळेही पर्मनंट लायसन्सपासून वाहनचालक वंचित राहू शकतो. कारण लवकरच आरटीओ कार्यालयाच्या करोडी येथील जागेत ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक (एडीटीटी) होणार आहे.
सध्या करोडी येथील जागेत पर्मनंट लायसन्ससाठी चाचणी घेतली जाते. मात्र, याठिकाणी सध्या कोणताही टेस्टिंग ट्रॅक नाही. मातीच्या ट्रॅकवरच दुचाकी, चारचाकी चालवून दाखवावी लागते. मात्र, लवकरच याठिकाणी अत्याधुनिक असा टेस्टिंग ट्रॅक होणार असून, त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
कशी असेल नवीन चाचणी?
- ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्टिंग ट्रॅक (एडीटीटी) : ही एक अत्याधुनिक तंत्रज्ञान-आधारित चाचणी प्रणाली असेल. यामध्ये मानवी हस्तक्षेपाशिवाय उमेदवाराच्या वाहन चालन कौशल्याचे मूल्यमापन केले जाणार आहे.
- सेन्सर आणि कॅमेरा आधारित तपासणी : या ट्रॅकवर विविध सेन्सर्स आणि कॅमेरे लावलेले असतील. ते उमेदवाराच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवतील. यात ‘एच’ ट्रॅक, इंग्रजी अंकातील ‘8’ हा ट्रॅक, समांतर पार्किंग आणि चढावर वाहन थांबवून पुन्हा पुढे नेणे यांसारख्या कौशल्यांची चाचणी घेतली जाईल
- चाचणी अधिक कडक : चाचणीत पारदर्शकता आणण्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी ठरते. लहानशा चुकीसाठीही गुण कमी होतील. त्यामुळे वाहनचालकांची चाचणी अधिक कडक होणार आहे.
- त्वरित अहवाल : चाचणी पूर्ण होताच त्वरित आणि अचूक अहवाल तयार होईल. उमेदवार चाचणीत पास झाला की अनुत्तीर्ण झाला, याची माहिती तात्काळ मिळेल.
- एकाच वेळी अनेकांच्या चाचणी : एकाच वेळी अनेक उमेदवारांची चाचणी घेऊन जलद सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यातून वेटिंग कमी होण्यास मदत होईल.
यंत्र, सेन्सरच्या मदतीने ड्रायव्हिंग टेस्ट
करोडी येथील जागेत ॲडव्हान्स ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक (एडीटीटी) होईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. यंत्रावर आधारित, सेन्सरच्या मदतीने ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाईल.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी.