औरंगाबाद : शहरात सध्या लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला वाढला आहे. त्यामुळे तापलेल्या लहान मुलांची प्रत्येक खासगी रुग्णालयात कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. खासगी रुग्णालयांना यासंदर्भात सूचना आणि कोरोना किटही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधाची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. याबाबत शासन स्तरावरून नुकताच आढावा घेण्यात आला. त्यात तिसऱ्या लाटेसाठी प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये १५ टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र, महापालिकेने गरवारे कंपनीच्या मदतीने लहान मुलांसाठी कोविड केअर सेंटरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे सेंटर कार्यान्वित होईल. तिसरी लाट कधी येईल, हे निश्चित नाही. शिवाय सध्या सर्दी, ताप, खोकल्याची साथ सुरू आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये दररोज रुग्ण, त्यात लहान मुले येत आहेत. खबरदारी म्हणून लहान मुलांच्या कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व खासगी हॉस्पिटलांना ॲंटिजन किट उपलब्ध करून दिल्या जातील.
६५ टक्के रुग्णांना होम आयसोलेशन
तिसऱ्या लाटेत ६५ टक्के रुग्ण हे लक्षणविरहित असतील असा अंदाज आहे. त्यामुळे या रुग्णांना होम आयसोलेशन दिले जाईल आणि केवळ लक्षण असलेल्या व गंभीर रुग्णांनाच कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
लहान मुले यापूर्वीही बाधित
कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लाटेत लहान मुलांनाही संसर्ग झाला होता. आतापर्यंत शहरात ० ते ५ वयोगटातील १४०४, ५ ते १८ वयोगटातील ७ हजार ८५४ जण बाधित आढळून आले होते. त्यामुळे महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून आतापासून तपासण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.