आता भगतसिंगगिरी सुरु, कुठल्याही क्षणी मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:21 IST2025-07-24T18:19:18+5:302025-07-24T18:21:28+5:30

पुणतांबा येथे शेतकऱ्यांसोबत चर्चा करून पुन्हा एकदा 'शेतकरी संपा'ची हाक देण्याबाबत निर्णय होणार

Now Bhagat Singhgiri has started, we will enter the Mantralaya with sheeps at any moment; Bachchu Kadu's warning in the Chakkajam movement | आता भगतसिंगगिरी सुरु, कुठल्याही क्षणी मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

आता भगतसिंगगिरी सुरु, कुठल्याही क्षणी मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू; बच्चू कडूंचा सरकारला इशारा

छत्रपती संभाजीनगर: पक्ष, जातीपातीमध्ये न अडकता आमचा शेतकरी एकत्र आला आहे, हा आमचा सर्वात मोठा विजय आहे. सात दिवस उपोषण,आठ दिवस पदयात्रा काढली तरी सरकारला जाग येत नाही. शेतकरी कर्जमाफीसाठी आता गांधीगिरी संपली असून यापुढील आंदोलन भगतसिंगगिरीने करू, मेंढ्यांसह मंत्रालयात घुसू, असा इशारा प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला. शहरातील प्रहारच्या चक्काजाम आंदोलनादरम्यान ते बोलत होते.

शेतकरी कर्जमाफी व्हावी, शेतकरी आत्महत्या थांबली पाहिजे, या मागण्यांसाठी प्रहारतर्फे आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. शहरात देखील क्रांतीचौक येथे प्रहारने  सकाळपासून भर पावसात आंदोलन सुरु केले. यावेळी कॉंग्रेस, मनसे,एमआयएम आदी पक्षांनी आंदोलनास साथ दिली. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी आंदोलन स्थळी येत सरकारवर ताशेरे ओढले. आंदोलनास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून आता संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करू. येथून थेट पुणतांबा येथे जात असून शेतकऱ्यांसोबत चर्चा करून पुन्हा एकदा 'शेतकरी संपा'ची हाक देण्याबाबत निर्णय घेऊ, असेही बच्चू कडू यांनी सांगितले. आंदोलनानंतर बच्चू कडू पोलिसांच्या स्वाधीन झाले.

आता कुठल्याही क्षणी मंत्रालयात घुसू 
बच्चू कडू पुढे म्हणाले, निवडणुकीवेळी सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले. आता म्हणत आहेत पिक चांगले आहे. पिक चांगले असले तरी त्याला भाव चांगला नाही, याचा विचार करावा. आमची रास्त मागणी असून सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. आंदोलनापूर्वी अनेकांना ताब्यात घेतले गेले. अतिशय वाईट पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात आली. आता गनिमी कावा करून मेंढ्यासह थेट मंत्रालयात घुसू , असा इशारा देत कडू यांनी निर्णायक लढा सुरु झाल्याचे स्पष्ट केले.

पुन्हा शेतकरी संपाची चाचपणी
सध्या कृषीमंत्र्याला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सरकारने तेवढेच प्रयत्न शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी करावेत. शेतकरी मुद्द्यावर अनेक पक्ष आमच्या सोबत आहेत. येथे राजकारण आणू नये, येथे शेतकरी हा विषय महत्वाचा आहे. बनवाबनवीचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या हुशारीने करतात. त्यांना असे वाटते की, लोकांना आपण मूर्ख बनवू, एकवेळ तुम्ही आम्हाला मूर्ख बनवा पण शेतकऱ्यांना बनवू नका. कारण शेतकऱ्यांचे हात थांबले तर अन्न मिळणार नाही. त्यामुळे तुम्हीच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी मागणी कडू यांनी केली.

Web Title: Now Bhagat Singhgiri has started, we will enter the Mantralaya with sheeps at any moment; Bachchu Kadu's warning in the Chakkajam movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.