आता मुलींचे ९ वे वर्ष काळजी करण्याचे, वयात येण्याचे वय १६ वर्षांवरून आले खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 19:08 IST2021-11-02T19:07:52+5:302021-11-02T19:08:40+5:30
जीवनशैलीतील बदलाबरोबर सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ही हार्मोन्समध्ये बदल होत आहे.

आता मुलींचे ९ वे वर्ष काळजी करण्याचे, वयात येण्याचे वय १६ वर्षांवरून आले खाली
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : पहिली मासिक पाळी येणे, हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. पहिली मासिक पाळी आल्यानंतर मुलगी वयात आली, असे म्हटले जाते. साधारणपणे वयाच्या १६ व्या वर्षी पहिली मासिक पाळी येते. परंतु गेल्या काही वर्षांत बदलती जीवनशैली, केमिकलयुक्त आहाराचा समावेश, वाढते वजन आणि या सगळ्यातून हार्मोन्समध्ये होणारे बदलाने मासिक पाळी येण्याचे वय कमी होत आहे. अगदी इयत्ता चौथीत म्हणजे वयाच्या ९ व्या वर्षी पाळी आल्याचे निरीक्षण घाटीतील तज्ज्ञांनी नोंदविले आहे.
अशा ९ ते १६ वयोगटातील मुलींचे घाटीतील अर्श क्लिनिकद्वारे मासिक पाळी संदर्भात समुपदेशन केले जात आहे. आहार आणि बदलत्या जीवनशैलीचा आरोग्यावर वेगवेगळा परिणाम होत आहे. मासिक पाळी येण्याच्या बाबतीत गेल्या काही वर्षात बदल होत आहे. कमी वयातच येणाऱ्या पाळीमुळे लहान वयातच मुलींची शारीरिक वाढ जलद गतीने होते. मात्र त्यांची मानसिक आणि भावनिक समज सक्षम होत नाही. शिवाय प्रत्येक मुलींना वेगवेगळ्या वयात पाळी येते. त्यामुळे ‘ माझ्या मैत्रिणीला असे काही होत नाही, मला का ? ’ असा प्रश्न पडतो. अशा वेळी आईची मोठी जबाबदारी ठरते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
खेळण्या- बागडण्याच्या वयात मासिक पाळी
साधारणपणे वयाच्या १६ वर्षी पहिल्यांदा पाळी येते. मात्र, अलिकडे अनेकांना इयत्ता चौथीत असताना म्हणजे वयाच्या ९ व्या वर्षीच पाळी येत असल्याचे पहायला मिळते. जीवनशैलीतील बदलाबरोबर सोशल मीडियाच्या प्रभावामुळे ही हार्मोन्समध्ये बदल होत आहे. त्यातूनच खेळण्या-बागडण्याच्या वयात मासिक पाळी आल्याने मुलींना नैराश्य येते. कारण तिच्या बरोबरच्या मुलींना तसे झालेले नसते. अशांचे घाटीत अर्श क्लिनिकद्वारे समुपदेशन केले जाते.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागप्रमुख
जीवनशैलीत बदलाचा परिणाम
पूर्वी १६ वर्षी मुलींना मासिक पाळी येत असे. परंतु बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, केमिकलयुक्त पदार्थांचा आहारात होणारा समावेश इ. कारणांनी हार्मोन्समध्ये बदल होतो. त्यामुळे मासिक पाळी येण्याचे वय अलीकडे कमी झाले आहे.
- डाॅ. निलेश लोमटे, मधुमेह व हार्मोन्स तज्ज्ञ