छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडाचा पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 19:26 IST2025-07-18T19:26:42+5:302025-07-18T19:26:57+5:30

पोलिस वाहनासमोर हॉर्न वाजवून गैरवर्तन, कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

Notorious gangster fatally attacks police officer in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडाचा पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगरात कुख्यात गुंडाचा पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

छत्रपती संभाजीनगर : रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असलेल्या पवन जैस्वाल याने तीन सहकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री (दि. १५) पावणे बाराच्या सुमारास सूतगिरणी चौकात घडली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिस अंमलदार फिर्यादी राहुल नरेश चावरिया (रा. गांधीनगर) हे मोटार वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. व्हीआयपी दौरे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना ने-आण करण्याचे काम करतात. सोमवारी (दि. १४) त्यांना एसआयडी कार्यालयातून फोन आला. त्यात पोलिस निरीक्षक भालेराव मॅडम यांना बीड येथे तपासासाठी मंगळवारी सकाळी घेऊन जायचे असल्याचा निरोप देण्यात आला. त्याप्रमाणे ते मंगळवारी बीड येथे जाऊन रात्री परत आले. पावणे बाराच्या सुमारास एसआयडी ऑफिसला पोहोचले. तेथून पीआय भालेराव यांना घरी सोडण्यासाठी वाहनाचा अंबरदिवा लावून ते स्नेहनगर येथून निघाले. दर्गा चौक मार्गे जात असताना विभागीय क्रीडा संकुलाजवळ त्यांच्या वाहनासमोर दोन दुचाकींवर चौघे जण हॉर्न वाजवत झिकझॅक पद्धतीने समोर जात होते. चावरिया यांच्या पोलिस वाहनाला पुढे जाण्यासाठी आरोपी रस्ता देत नव्हते.

सूतगिरणी चौकाजवळ चावरिया यांनी त्यांच्या पुढे पोलिस वाहन नेले. तेव्हा चौघेही शिवीगाळ करून थांबण्याचा इशारा करू लागले. चावरिया यांनी वाहन थांबवले. तेव्हा दुचाकीवरून (एमएच २० एफडी ७६०५) पवन जैस्वाल उतरला. त्याने पोलिस वाहनाचा दरवाजा ओढून शिवीगाळ केली. चावरिया यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू केली. तेव्हा पवन जैस्वालने फायटरने पोलिस अंमलदार चावरिया यांच्या डोळ्याच्या खाली मारून जखमी केले. अन्य तिघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्याच्या पाठीमागे फायटरने प्रहार केल्याने चावरिया बेशुद्ध झाले. शुद्धीवर आले तेव्हा ते आयसीयूमध्ये होते. पीआय भालेराव यांनी त्यांना आनंदी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथून सिग्मामध्ये हलविण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रसाद कऱ्हाळे करत आहेत.

‘एमपीडीए’ कायद्यानुसार होता कारागृहात
पोलिसांच्या वाहनावर हल्ला करून अंमलदाराला ठार मारण्याचा प्रयत्न करणारा पवन जैस्वाल हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वीच तो ‘एमपीडीए’ कायद्यानुसार हर्सूल कारागृहातून बाहेर आला आहे. पोलिसावर हल्ला केल्यानंतर तो साथीदारांसह फरार झाला आहे.

Web Title: Notorious gangster fatally attacks police officer in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.