ड्रग्ज पेडलर अशफाक शेखचे रॅकेट उद्ध्वस्त; आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या मैत्रिणीलाही अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:40 IST2026-02-13T15:40:35+5:302026-02-13T15:40:54+5:30
ड्रग्स तस्करीत पहिल्यांदाच पोलिसांनी आरोपींची ११ बँक खाती गोठवली; १७ दिवसांत रॅकेटमधील दोन महिलांसह एकूण १६ स्मगलर्सला अटक

ड्रग्ज पेडलर अशफाक शेखचे रॅकेट उद्ध्वस्त; आर्थिक व्यवहार सांभाळणाऱ्या मैत्रिणीलाही अटक
छत्रपती संभाजीनगर : दिल्ली, मुंबई, गुजरात, मध्यप्रदेशमधील स्मगलर्सच्या संपर्कात राहून शहरात अंमली पदार्थांचे रॅकेट चालवणारा कुख्यात गुन्हेगार अशफाक शेख इसाक (रा. रवींद्र नगर, शहाबाजार) याचे अमली पदार्थांचे आर्थिक व्यवहार सांभाळणारी साथीदार, मैत्रीण इशरत अकिब शेख (२८) हिला गुन्हे शाखेने शनिवारी अटक केली. गेल्या १७ दिवसांत अटक झालेल्या अशफाकच्या प्रत्येक साथीदाराकडून तिच्या बँक खात्यावर पैसे आल्याचे सबळ पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
२५ जानेवारी रोजी लातूरहून अशफाकच्या सांगण्यावरून शहरात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या पातळ औषधांचा साठा घेऊन आलेल्या चौघांच्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. यात आरोपींनी पोलिसांच्या अंगावर कार घालून पसार होण्यापर्यंत मजल मारली. यांना अटक होताच अशफाक रात्रीतून पळून गेला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले यांनी याची गंभीर दखल घेतली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक रविकांत गच्चे यांना या रॅकेटची पाळेमुळे शोधून काढण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या. त्यानंतर १७ दिवसांत रॅकेटचे साथीदार असलेल्या दोन महिलांसह एकूण १६ तस्करांना अटक करून लाखोंचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
दीड महिन्यात ३८३ कॉलवर संपर्क
-अशफाकची ड्रग्ज स्मगलिंगची साथीदार व मैत्रीण इशरत अकिब शेख ही त्याच्याच परिसरात राहते. त्यामुळे दोघांचा जुना परिचय आहे. अशफाकच्या सांगण्यावरून ती ड्रग्जचे सर्व खरेदी विक्रीचे आर्थिक व्यवहार सांभाळत होती.
-गेल्या दीड महिन्यात ती व अशफाकमध्ये ३८३ कॉलद्वारे संपर्क झाला. बहुतांश वेळी ते व्हॉट्सॲप कॉलचा वापर करत होते. दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले असून तिला तीन अपत्ये आहेत. रवींद्रनगरमध्ये ती भावासोबत राहते.
-विशेष म्हणजे, अशफाकचे घर व मार्गावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआर तिच्या घरात होता. पोलिसांनी तो जप्त केला.
अकरा बँक खाते गोठवले
अटकेतील १६ पैकी ८ आरोपींसोबत इशरतचे थेट व्यवहार निष्पन्न झाले. यासाठी तिने तीन बँक खाते उघडले होते. अटकेदरम्यान त्या खात्यात दीड लाख रुपये रक्कम आढळून आली. तिच्या तीन बँक खात्यांसह अटकेतील ८ आरोपींचे बँक खाते पोलिसांनी गोठवले आहेत.
रॅकेटचे उच्चाटण, १६ जणांना अटक:
२५ जानेवारी : शेख समीर राजासाब (२४, रा. आनंदनगर, लातूर), सय्यद अल्ताफ वहाब (२३, रा. बालाजीचीवाडी, ता. उदगीर, जि. लातूर), उमर अब्दुल साहाब शेख (३६, रा. बुऱ्हाणनगर, लातूर)
२७ जानेवारी : सय्यद शाहिद अली सय्यद इब्राहिम अली (३०, रा. एस. टी. कॉलनी, उदगीर)
२९ जानेवारी : शेख कलीम शेख सरदार (३५), अनिता अविनाश पाचोंदे (२०), अविनाश शेषराव पाचोंदे (२३, तिघे रा. रवींद्रनगर) व शेख मुस्ताक शेख ईसाक (२७, रा. एस. टी. कॉलनी)
३० जानेवारी : सय्यद रहिम सय्यद अन्वर (२६, रा. सिटीचौक परिसर)
४ फेब्रुवारी : ओबेदुल्ला अब्दुल्ला (३२, रा. किराडपुरा), शेख सोफियान शेख नजीर (३४, रा. बायजीपुरा), अब्दुल नावीद खान अब्दुल समी खान (३१, रा. जिन्सी), शेख नावेद शेख हमीद (२५, रा. लेबर कॉलनी) व शेख अय्याज उर्फ शेरु शेख सिराज (४२, रा. किलेअर्क) यांना गुन्हे शाखेने रात्रीतून अटक केली.
७ फेब्रुवारी : शेख आफताब शेख सलीम (१९, रा. भोईवाडा) व शेख इराफ शेख अरशद (रा. अबरार कॉलनी, बीडबायपास)
५१ लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
२५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान गुन्हे शाखेने केलेल्या पाच प्रमुख कारवायांमध्ये नशेच्या पातळ औषधांच्या ४७ लाख २० हजार रुपयांच्या ११ हजार ७९९ बाटल्या तर ४ लाख ४४ हजार रुपयांचे ७५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले.
४६ आरोपींचा शोध सुरू
अटकेतील १६ आरोपींच्या संपर्कात असलेल्या ४६ पेडलर्सची यादी तयार केली आहे. हे सर्व पेडलर्स शहर सोडून पसार झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या घरावरही पाळत ठेवली असून अशफाकच्या घरात प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद तरुणांचाही शोध सुरू केला आहे.