रोजगार हमी योजनेंत ६१.७४ लाखांच्या अपहार प्रकरणी २ ग्रामसेवकांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 19:31 IST2025-12-09T19:30:25+5:302025-12-09T19:31:21+5:30
फुलंब्री तालुक्यातील रोहयोचे प्रकरण; ४८ तासांत खुलासा देण्याचे आदेश

रोजगार हमी योजनेंत ६१.७४ लाखांच्या अपहार प्रकरणी २ ग्रामसेवकांना नोटीस
फुलंब्री : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फुलंब्री तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या मातोश्री पाणंद रस्ते योजनेच्या कामातील घोटाळ्या प्रकरणात धामणगाव येथील ६१ लाख ७४ हजार ९२२ रुपयांच्या अपहाराच्या संशयावरून दोन ग्रामसेवकांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली आहे.
धामणगाव येथील मातोश्री पाणंद रस्त्यासह एकूण ९ पाणंद रस्त्यांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी न करताच देयके अदा केल्याचा एस. बी. गजेवाड आणि सरला इंगळे या दोन ग्रामसेवकांवर संशय आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुपमा नंदनवनकर यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला. त्या अहवालातील नोंदीनुसार, शासनाच्या निकषांनुसार तपासणी न करता संबंधित ग्रामसेवकांनी वरिष्ठांची दिशाभूल केली असून प्रत्यक्ष काम न झालेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खर्च दाखविल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद केले आहे. संबंधित ग्रामसेवकांनी आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडले नाही. त्यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा २००५ तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम क्रमांक ३ चा भंग झाल्याचे सिद्ध होत आहे.
त्यानुसार ग्रामसेवक एस. बी. गजेवाड आणि सरला इंगळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तुमच्याकडून एकूण ६१ लाख ७४ हजार ९२२ रुपयांची रक्कम का वसूल करू नये? तसेच शिस्तभंगाची कारवाई का करू नये, याबाबतचा सविस्तर खुलासा ४८ तासांत सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिला आहे.