मोठा निर्णय! छ. संभाजीनगरात आता दुचाकीला २०० तर चारचाकीला फक्त २००० रुपयांचे इंधन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 15:07 IST2026-03-26T15:01:16+5:302026-03-26T15:07:08+5:30
इंधन टंचाईच्या अफवेनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय; दुचाकी-चारचाकी गाड्यांसाठी इंधन मर्यादा लागू

मोठा निर्णय! छ. संभाजीनगरात आता दुचाकीला २०० तर चारचाकीला फक्त २००० रुपयांचे इंधन!
छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही, सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांनी अभूतपूर्व गर्दी केली आहे. या अनपेक्षित मागणीमुळे पुरवठ्याचा समतोल बिघडल्याने, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी यांनी इंधन वितरणावर कडक निर्बंध लादले आहेत. जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत हे आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत.नवे
नियम: दुचाकीला २००, चारचाकीला २०००
प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, आता दुचाकी वाहनांसाठी एका वेळी जास्तीत जास्त २०० रुपये, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २००० रुपयांपर्यंतच इंधन भरता येणार आहे. या मर्यादेमुळे पंपांवरील रांगा कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना विनाविलंब प्राधान्याने इंधन पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कॅन आणि बाटल्यांमध्ये इंधन देण्यास बंदी
अनेक नागरिक भीतीपोटी कॅन, प्लास्टिक बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन साठवून ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कोणत्याही स्वरूपाच्या सुट्या भांड्यात इंधन देण्यास सक्त मनाई केली आहे. प्रत्येक पेट्रोल पंपाने आपल्याकडील शिल्लक साठा आणि रोजची मागणी याची माहिती फलकावर प्रदर्शित करणे आता बंधनकारक असणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पंपचालकांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.