मकाई गेट–पानचक्की गेटसाठी नवा पर्यायी मार्ग मार्चनंतर; पालकमंत्री संजय शिरसाटांचा विश्वास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:20 IST2025-11-19T16:16:53+5:302025-11-19T16:20:02+5:30
या दोन्ही पुलांवरील ताण लक्षात घेऊन मार्चनंतर पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी कॅबिनेटची मंजुरी घेतली जाईल, असा विश्वास पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला.

मकाई गेट–पानचक्की गेटसाठी नवा पर्यायी मार्ग मार्चनंतर; पालकमंत्री संजय शिरसाटांचा विश्वास!
छत्रपती संभाजीनगर : मकाई गेट व पानचक्की गेटमधून जाणारे दोन्ही रस्ते हे रहदारीचे व शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचे आहेत. या दोन्ही पुलांवरील ताण लक्षात घेऊन मार्चनंतर पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी कॅबिनेटची मंजुरी घेतली जाईल, असा विश्वास पालकमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, जयसिंगपुरा कृती समितीच्यावतीने शनिवारी पालकमंत्री संजय शिरसाट व मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास आ. जैस्वाल हे लवकर येऊन गेले, त्यानंतर पालकमंत्री शिरसाट आले. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा वेगवेगळा सत्कार करण्यात आला.
यावेळी समितीने या दोन्ही नेत्यांकडे ११ मागण्यांचा प्रस्ताव सादर केला. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री शिरसाट यांनी ‘विकासकामांना निधी कमी पडून देणार नाही’, तर आ. जैस्वाल यांनी ‘कृती समितीने केलेल्या मागण्या या लोकांसाठी आहेत. आम्ही विकासकामे करताना कुठलाही भेदभाव करत नाहीत’, असे सांगितले.
व्यासपीठावर माजी नगरसेवक अफसर खान, माजी नगरसेविका पुष्पा सलामपुरे, ज्ञानेश्वर जाधव, अनिल भिंगारे, गणेश पेरे, रवि जाधव, विलास संभाहारे, युवराज डोंगरे, अमोल झळके आदींची प्रमुख उपस्थिती होती. कृती समितीच्यावतीने प्रतिभा जगताप, डॉ. फुलचंद सलामपुरे, विनायक (गणू) पांडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक नागराज गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन संदेश वाघ यांनी केले.