पेंटरच्या अल्पवयीन पत्नीला शेजाऱ्याने पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 19:31 IST2019-12-28T19:29:22+5:302019-12-28T19:31:28+5:30
पीडितेने पती आणि माहेरी जाण्यास नकार दिल्याने तिची रवानगी महिला बालसुधारगृहात करण्यात आली.

पेंटरच्या अल्पवयीन पत्नीला शेजाऱ्याने पळविले
औरंगाबाद : घरासमोर राहणाऱ्या पेंटरच्या अल्पवयीन पत्नीला पळवून नेणाऱ्या तरुणाला बेगमपुरा पोलिसांनी पुण्यातून पकडून आणले. त्याच्यासोबत असलेल्या पीडितेने पती आणि माहेरी जाण्यास नकार दिल्याने तिची रवानगी महिला बालसुधारगृहात करण्यात आली.
ज्ञानेश्वर उमाजी पवार (२८, रा. दत्तनगर, जटवाडा रोड), असे अटक केलेल्याचे नाव आहे. याविषयी बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, उमाजीच्या घरासमोरच पीडिता पेंटर पतीसोबत राहत होती. पीडितेचे आज वय १६ वर्षे २ महिने आहे, तर तिच्या पतीचे २१ वर्षे. दोन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर दोघेही आरोपीच्या घरासमोर राहण्यास आले. दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच वाजता ज्ञानेश्वरने पीडितेला पळवून नेले. याविषयी बेगमपुरा पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वरविरोधात गुन्हा नोंद झाला होता. पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे आणि कर्मचाऱ्यांनी या दोघांचा तपास केला तेव्हा ते पुण्यात राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी २७ डिसेंबर रोजी ज्ञानेश्वर आणि पीडितेला ताब्यात घेत औरंगाबादेत आणले. पोलिसांनी ज्ञानेश्वरला अटक केली, तर पीडितेने मात्र पतीकडे अथवा माहेरी जाण्यास नकार दिल्याने तिची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
बालविवाह करणारे दोषी
बालविवाह लावणे कायद्यानुसार गुन्हा आहे, असे असताना पीडिता आणि तिच्या पतीचे वय लग्नावेळी अनुक्रमे १४ वर्षे आणि १९ वर्षे होते. कायद्यानुसार लग्नासाठी मुलीचे वय १८, तर मुलाचे वय २१ असणे बंधनकारक आहे. मात्र, त्यांचा बालविवाह लावण्यात आल्याचे दिसून येते, असे पोलिसांनी सांगितले.