दुप्पट पैस्यांचे आमिष दाखवून माय डायल डिजिटलने घातला १६ कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 19:08 IST2018-10-27T19:07:29+5:302018-10-27T19:08:27+5:30
शहरातील सुमारे पाचशे गुंतवणूकदारांमार्फत साडेचार हजार नागरिकांना सुमारे १६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले.

दुप्पट पैस्यांचे आमिष दाखवून माय डायल डिजिटलने घातला १६ कोटींचा गंडा
औरंगाबाद : कंपनीत गुंतवणूक करा आणि पुढील दहा महिन्यांत दुप्पट रक्कम घ्या, तसेच एलईडी मिळवा, अशा प्रकारचे आमिष दाखवून शहरातील सुमारे पाचशे गुंतवणूकदारांमार्फत साडेचार हजार नागरिकांना सुमारे १६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री वेदांतनगर ठाण्यात कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा नोंदविला.
आकाश सरोदे, पुरुषोत्तम चचेरे, प्रणव बाला, अभिजित देव, योगेश टोपले, सचिन मेश्राम, स्वीटी आकाश सरोदे, अशी गुन्हा नोंद झालेल्या कंपनी संचालकांची नावे आहेत. याविषयी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले म्हणाले की, माय डायल डिजिटल एलईडी अॅण्ड प्रा.लि. कंपनीने गतवर्षी शहरात विविध सेमीनार घेऊन कंपनी गुंतवणुका स्वीकारून दहा महिन्यांत दुप्पट रक्कम देते.त्यासाठी कंपनीत गुंतवणूक करा आणि हवा तेवढा परतावा घ्या, असे आमिष दाखविले जाई.
कंपनीच्या संचालकांच्या आमिषाला बळी पडून जटवाडा रस्त्यावरील अमोल प्रकाश मावस यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये कंपनीत दहा लाख १ हजार रुपये गुंतविले. कंपनीने जानेवारी २०१८ पर्यंत अमोल यांना परतावा दिला, त्यानंतर पैसे देणे थांबविले. एवढेच नव्हे, तर कंपनीची वेबसाईट बंद केली. कंपनीच्या संचालकांसोबत त्यांचा संपर्क होईना. कंपनीने आपल्यासह सुमारे ५०० जणांमार्फत सुमारे साडेचार हजार नागरिकांचे आय.डी. तयार करून १६ कोटी रुपये गोळा केल्याचे त्यांना समजले. अमोल यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे तक्रार केली.
२१ हजारांच्या बदल्यात ३७ हजार देण्याचा दावा
२१ हजार रुपये गुंतवणूक केल्यास दरमहा ३ हजार ७८० रुपयांप्रमाणे दहा महिन्यांत ३७ हजार ८०० रुपये, ४९ हजार रुपये गुंतवणुकीवर दहा महिन्यांत ८८ हजार २०० रुपये आणि प्रत्येक गुंतवणूकदाराला जाहिरातीचा एक एलईडी देण्यात येईल, असे सांगितले होते. गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा त्यांच्या खात्यात जमा होईल, शिवाय कंपनीच्या वेबसाईटवर त्यांची नावे दिसतील, असेही संचालक सांगत.