वक्फ कायद्याच्या विरोधात हिंदू बांधवांनी साथ द्यावी; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:06 IST2025-05-26T12:06:14+5:302025-05-26T12:06:14+5:30
ही लढाई कोणत्या जातीधर्माच्या विरोधात नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आहे.

वक्फ कायद्याच्या विरोधात हिंदू बांधवांनी साथ द्यावी; मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने वक्फ कायद्यात सुधारणा करून नवीन कायदा तयार केला. त्यामुळे आम्ही देशभरात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या माध्यमातून विरोध करतोय. या विरोधात हिंदू बांधवांनीही साथ द्यायला हवी. ही लढाई कोणत्या जातीधर्माच्या विरोधात नाही. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध आहे. या देशाचे आम्ही नागरिक आहोत. या देशाचे वारसदार आहोत, आमच्या पूर्वजांचा वारसा आम्हीच सांभाळणार, असे मत मौलाना यासीन अली उस्मानी बदायूनी यांनी व्यक्त केले.
आमखास मैदानावर रविवारी रात्री ‘तहफ्फुज-ए-औकाफ कॉन्फरन्स’चे आयोजन केले होते. सायंकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असतानाही हजारोंच्या संख्येने अल्पसंख्याक बांधव परिषदेला उपस्थित होते. ‘मगरिब’च्या नमाजनंतर सुरू झालेल्या परिषदेत अनेक मान्यवरांनी वक्फ कायद्याच्या नव्या मसुद्याच्या विरोधात मत व्यक्त केले.
यावेळी एमआयएम पक्षाचे नासेर सिद्दीकी, राष्ट्रवादीचे इलियास किरमाणी, रफियोद्दीन अशरफी, जुनैद-उर-रहेमान कासमी, मौलाना इलियास फलाही, दिल्लीचे ॲड. शमशाद, मौलाना मोईजोद्दीन कासमी, जियाउद्दीन सिद्दीकी, महेफूज-उर रहेमान यांनी मार्गदर्शन केले.
पूर्वजांच्या जमिनी वाचवणार
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य हजरत मौलाना उमरैन महफूज रहमानी यांनी सरकारला इशारा दिला की वातावरण खराब नका करू, आमच्या पूर्वजांच्या जमिनी आम्हीच वाचवणार आहोत. आमच्यासोबत व्यासपीठावर हिंदू भाऊही उभे आहेत.
-उमरैन महफूज रहमानी
जमिनींचा वापर इस्लामसाठीच
मुस्लिमांच्या पूर्वजांनी अल्लाहसाठी जमिनी वक्फ केल्या. त्या कोणाच्या मालकीच्या नाहीत. या जमिनींचा वापर इस्लामसाठीच होईल. भावी पिढ्या त्या जमिनींचा वापर करतील. कब्रस्तान कुठून आणायचे ? लोकसभेत मंजूर कायद्याचा आढावा घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. न्यायमूर्तींनाही भाजप नेते धमकावत आहेत.
- आ. जितेंद्र आव्हाड
पाठीशी खंबीरपणे उभे
‘वक्फ’च्या या काळ्या कायद्याच्या विरोधात काँग्रेसने लोकसभेत ताकदीने विरोध केला. जोपर्यंत सरकार हा कायदा माघारी घेणार नाही, तोपर्यंत लढा सुरू राहील. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
- खा. कल्याण काळे
संविधानाची चौकट तोडली
वक्फ नव्या कायद्याच्या माध्यमातून गरीब मुस्लिमांचा उद्धार करणार, असे सरकार सांगत आहे. हे खोटे आहे. जुन्या कायद्यानुसारसुद्धा उद्धार करता आला असता. संविधानाच्या चौकटीत हा कायदा नाही. कलम २४, ३६ चे उल्लंघन होत आहे.
- मौलाना मलिक मोहतसीम