औरंगजेब व मोगलांशी मुस्लिम बांधवांनी नाते जोडू नये; रामदास आठवलेंचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:13 IST2025-03-24T19:13:25+5:302025-03-24T19:13:42+5:30

औरंगजेबाची कबर हटवण्यास रिपाइं (ए)चा विरोध

Muslim brothers should not associate with Aurangzeb and the Mughals; Ramdas Athawale appeals | औरंगजेब व मोगलांशी मुस्लिम बांधवांनी नाते जोडू नये; रामदास आठवलेंचे आवाहन

औरंगजेब व मोगलांशी मुस्लिम बांधवांनी नाते जोडू नये; रामदास आठवलेंचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेब व मोगलांशी मुस्लिम बांधवांनी नाते जोडू नये असे आवाहन करीत, रिपाइंचा (आठवले गट) औरंगजेबाची कबर हटवण्यास विरोध असल्याचे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. विनाकारण हा वाद कुणीही उकरून काढू नये, असे ते म्हणाले. या प्रश्नावर आता हिंदूंनीही शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले. एक दिवसाच्या दौऱ्यावर आले असता ते दुपारी सुभेदाररी गेस्ट हाऊसवर पत्रकारांशी बोलत होते.

छत्रपती संभाजीनगरात छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारावे, पीईएसच्या इमारतींच्या नूतनीकरणासाठी सरकारने पाचशे कोटींचा निधी द्यावा, कमवा व शिका योजना राबविण्यासाठी सरकारने पीईएसला शंभर एकर जमीन उपलब्ध करून द्यावी व संस्थेला मेडिकल कॉलजेची परवानगीही द्यावी, अशा मागण्या आठवले यांनी यावेळी सरकारकडे केल्या. पीईएसचा चेअरमन मीच असल्याचा पुनरुच्चार आठवले यांनी यावेळी केला. संबंधित प्राचार्यांनी याची नोंद घेतली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी सध्या आंदोलन सुरू आहे. येत्या २८ ते ३० मार्चपर्यंत बिहारच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात मी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रिपब्लिकन ऐक्य कधी तरी होईल का असे विचारले असता, ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय हे ऐक्य होऊ शकत नाही. मी तर त्यांचं नेतृत्व मान्य करायला तयार आहे.

समाजकल्याण खात्याचा निधी इतरत्र वळवता कामा नये. लाडक्या बहिणींना २१०० रुपये अनुदान देण्याचे आश्वासन पाळले पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला, हे सिद्ध झाले आहे. आता तरी सरकारने दलित, बौद्ध, आदिवासींवरील अन्याय- अत्याचाराकडे अधिक लक्ष दिले पाहिजे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली. प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करण्यात आले पाहिजे, अशा मागण्यांचा आग्रह त्यांनी यावेळी धरला. १ जून रोजी ठाणे येथे पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पत्रपरिषदेस बाबूराव कदम, मिलिंद शेळके, ब्रह्मानंद चव्हाण, दौलत खरात, विजय मगरे, नागराज गायकवाड, अरविंद अवसरमल यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Muslim brothers should not associate with Aurangzeb and the Mughals; Ramdas Athawale appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.