पैठणगेट परिसरात हत्येनंतर मनपाचा मोठा निर्णय; अनधिकृत, रस्ता बाधित बांधकामे काढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 14:57 IST2025-11-14T14:55:03+5:302025-11-14T14:57:13+5:30
पैठणगेट भागातील विविध रस्त्यांवर मनपाकडून युद्धपातळीवर टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात आले.

पैठणगेट परिसरात हत्येनंतर मनपाचा मोठा निर्णय; अनधिकृत, रस्ता बाधित बांधकामे काढणार
छत्रपती संभाजीनगर : पैठण गेटवर सोमवारी रात्री एका तरुणाचा भर रस्त्यात निर्घृणपणे खून करण्यात आला. या घटनेनंतर परिसरातील अतिक्रमणांवर एका समाजाने बोट ठेवले. त्यामुळे महापालिकेनेही तत्परतेने कारवाईला सुरुवात केली. गुरुवारी या भागातील मुख्य रस्त्यांचे टोटल स्टेशन सर्वेक्षण करण्यात आले. लवकरच या भागातील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार आहे.
पैठणगेट परिसर मागील काही वर्षांत मोबाईल दुकानांचे ‘हब’ बनला आहे. या ठिकाणी मोबाईल विक्रेते, दुरुस्ती, ॲक्सेसरीज विक्रीची दुकाने वाढली आहेत. सोमवारी रात्री १०:३० वाजता एका मोबाईल दुकानात काम करणाऱ्या तरुणाने इम्रान अकबर कुरैशी (३३) याची दुकानासमोरच हत्या केली. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी कुरैशी समाजबांधवांनी मनपाच्या झोन क्रमांक २ मध्ये ठिय्या आंदोलन केले. अतिक्रमित दुकानांची तक्रार केली. मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागाने ज्या दुकानांसमोर हत्या झाली, त्या दोन दुकानांवर नोटीस लावली. दोन दिवसांत मालकी हक्काची कागदपत्रे, बांधकाम परवानगी मागितली.
रस्ता रुंदीकरण मोहीम
गुरुवारी मनपाच्या नगररचना विभागाने टोटल स्टेशन सर्वेक्षण केले. पैठणगेट ते सिल्लेखाना, पैठणगेट ते सब्जी मंडी व पैठणगेट ते खोकडपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर किती मालमत्ता रस्त्यात बाधित होतील, हे टोटल स्टेशन सर्वेक्षणानंतर स्पष्ट होणार आहे. पैठणगेट ते सिल्लेखाना चौक हा रस्ता ३० मीटरचा तसेच पैठणगेट ते सब्जी मंडी हा रस्ता ६ मीटरचा, पैठणगेट ते खोकडपुऱ्याकडे जाणारा रस्ता १५ मीटर रुंदीचा आहे. त्यानुसार रुंदीकरण केले जाणार आहे. नगर रचना विभागाचे राहुल मालखरे, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद यांच्या पथकाने हे टोटल स्टेशन सर्वेक्षण केले.
मनपा, पोलिसांची संयुक्त कारवाई
पैठण गेट येथील खुनाच्या घटनेनंतर अनधिकृत दुकानांचा मुद्दा कुरैशी समाजाने उपस्थित केला. त्यामुळे महापालिका व पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली जाणार आहे. शनिवारी या भागात कारवाई होण्याची शक्यता असल्याचे अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांनी सांगितले.