ऐन उन्हाळ्यात छ. संभाजीनगर, जालनाचा पाणीपुरवठा बंद? पाणीपट्टी थकल्याने कडाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:58 IST2025-03-24T13:57:32+5:302025-03-24T13:58:13+5:30

लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने (कडा)मनपाला नोटीस बजावून पाणीपट्टीची थकबाकी भरा, अन्यथा मंगळवारी जायकवाडी येथून शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला

'Municipal Corporation' owes Rs 53 crore in water bills; Water supply to Chhatrapati Sambhajinagar, Jalna, Paithan and Gangapur to be cut off? Warning from Kada office | ऐन उन्हाळ्यात छ. संभाजीनगर, जालनाचा पाणीपुरवठा बंद? पाणीपट्टी थकल्याने कडाचा इशारा

ऐन उन्हाळ्यात छ. संभाजीनगर, जालनाचा पाणीपुरवठा बंद? पाणीपट्टी थकल्याने कडाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : वारंवार मागणी करूनही शहर महापालिकेने पाणीपट्टीच्या बिलाची थकबाकी असलेल्या ५३ कोटी रुपयांपैकी केवळ चार कोटी पाच लक्ष रुपयांचाच भरणा केला आहे. आता मार्च एंडच्या तोंडावर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने (कडा)मनपाला नोटीस बजावून पाणीपट्टीची थकबाकी भरा, अन्यथा मंगळवारी जायकवाडी येथून शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. अशाच प्रकारे जालना महापालिका, पैठण आणि गंगापूर न.प. नाही नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

जायकवाडी प्रकल्पातून छत्रपती संभाजीनगर शहराला दरमहा ४.५० दलघमी पाणी पुरवठा करण्यात येतो. कडा कार्यालयाकडून महापालिकेला दरमहा १ कोटी २५ लाख रुपयांचे बिल देण्यात येते. महापालिकेकडून कडाला पाणीपट्टीचे बिल नियमित अदा करण्यात येत नाही. यामुळे बिलाची रक्कम वाढत असते. वेळेवर बिल न भरण्यास जलसंपदा विभागाकडून या रकमेवर व्याजाची आकारणी केली जाते. जानेवारी २०२५ अखेर महापालिकेकडे ५३ कोटी रुपयांची पाणी बिले थकविली आहेत. शहर मनपाने कडा कार्यालयास आतापर्यंत ४ कोटी ५० लाख रुपये दिले आहेत. उर्वरित रक्कम अदा करावी, यासाठी कडा कार्यालयाचे अधिकारी वारंवार मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिल अदा करण्याची विनंती करीत असतात. आता मार्च एंडजवळ येताच कडाच्या वतीने वसुलीसाठी तगादाही वाढविला आहे. महापालिकेला नोटीस बजावून सोमवारपर्यंत बिल अदा न केल्यास मंगळवारी जायकवाडी येथून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला.

मंगळवारी पाणीपुरवठा खंडित करणार
जायकवाडी प्रकल्पातून छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन मोठ्या शहरांना तसेच पैठण, गंगापूर नगर परिषदांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या स्थानिक स्वराज्य संस्थांना आमच्याकडून नियमित पाणी बिल पाठविण्यात येते. छत्रपती संभाजीनगर मनपाकडे ५३ कोटी रुपयांचे पाणी बिल जानेवारीअखेरपर्यंतचे आहे. मात्र, महापालिकेकडून वर्षभरात केवळ चार कोटी पाच लाख रुपये अदा करण्यात आले. जालना मनपा, गंगापूर आणि पैठण नगरपरिषदांनी वर्षभरात पाणी बिलापोटी एक रुपयाही अदा केला नाही. यामुळे त्यांनाही नोटीस बजावून पाणी बिल रक्कम जमा न केल्यास मंगळवारी पाणीपुरवठा खंडित करणार असल्याचे कळविले आहे.
- दीपक डोंगरे, उपकार्यकारी अभियंता

जालना महानगरपालिका
एकूण थकबाकी - ९ कोटी ६८ लाख
सरासरी माहे देयक रकम             - १५ लक्ष
सरासरी मासिक पाणीवापर - ०.८५ दलघमी
आतापर्यंत भरलेली रक्कम - ००

पैठण नगर परिषद
एकूण थकबाकी - ३ कोटी ३६ लाख
सरासरी माहे देयक रक्कम             ४ लक्ष २५ हजार
सरासरी मासिक पाणीवापर            ०.०२५ दलघमी
आतापर्यंत भरलेली रक्कम -- ००

गंगापूर नगर परिषद
एकूण थकबाकी -५१ लक्ष ९४ हजार
माहे देयक रकम                        -२ लक्ष ५०
सरासरी मासिक पाणीवापर - ०.०८ दलघमी
आतापर्यंत भरलेली रक्कम-००

Web Title: 'Municipal Corporation' owes Rs 53 crore in water bills; Water supply to Chhatrapati Sambhajinagar, Jalna, Paithan and Gangapur to be cut off? Warning from Kada office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.