एसीबीची मोठी कारवाई; मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी लाच घेताना अटकेत

By सुमित डोळे | Updated: January 28, 2025 19:20 IST2025-01-28T19:20:14+5:302025-01-28T19:20:56+5:30

मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी ७ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटकेत

Municipal Corporation Fire Department Chief, Employees Caught in Bribe Trap in Chhatrapati Sambhaji Nagar | एसीबीची मोठी कारवाई; मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी लाच घेताना अटकेत

एसीबीची मोठी कारवाई; मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख, कर्मचारी लाच घेताना अटकेत

छत्रपती संभाजीनगर : वाळूज परिसरातील पेट्रोलपंपाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्विकारताना महानगरपालीकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी रायबा भगवान पाटील (५९) व त्यांचा तृतीय श्रेणी कर्मचारी वैभव विजय बाकडे (३८) यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता पदमपुऱ्यातील अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. 

५२ वर्षीय व्यवसायिकाचे वाळूजलगत असलेल्या नारायणपूर बु. परिसरात पेट्रोपंप उभारणे नियोजित आहे. त्यासाठी अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र महत्वाचे असते.  गेल्या अनेक दिवसांपासून ते त्यासाठी पदमपुऱ्यातील अग्निशमन विभागात चकरा मारत होते. मात्र, पैशांसाठी त्यांचे काम अडवून ठेवण्यात आले. तीन दिवसांपूर्वी बाकडेने रायबा पाटील यांच्या नावाने पुन्हा त्यांना १० हजार रुपयांची मागणी केली. त्यांच्या छळामुळे संतापलेल्या ५२ वर्षीय व्यवसायिकाने याची थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अधीक्षक संदिप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. आटाेळे यांच्या सुचनेवरुन उपअधीक्षक केशव दिंडे, निरीक्षक अमोल धस यांना तक्रारीची खातरजमा करण्याचे आदेश दिले. 

मंगळवारी थेट छापा
सोमवारी निरीक्षक अमोल धस यांना तक्रारीत तथ्य आढळले. मंगळवारी धस, अंमलदार युवराज हिवाळे यांनी सायंकाळी सापळ्याचे नियोजन केले. तक्रारदाराने पुन्हा रक्कम कमी करण्याची विनंती केली.  रायबा पाटीलने त्याच्या दालनात तडजाेडीअंती ७ हजार रुपये बाकडेकडे देण्याची सुचना केली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी ५ वाजता बाकडे कार्यालयात सदर लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडला गेला. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. 

मनपाचा अग्निशमन विभाग हादरला
सहा महिन्यांपूर्वी मनपाच्या अग्निशमन विभागातील आर्थिक व्यवहारांची जोरदार चर्चा उघड झाली होती. अग्निशमन विभागाच्या या अर्थकारणाकडे वरीष्ठांकडून देखील दुर्लक्ष केले गेल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत गेल्याची चर्चा या कारवाईनंतर मनपा वर्तुळात सुरू होती.

Web Title: Municipal Corporation Fire Department Chief, Employees Caught in Bribe Trap in Chhatrapati Sambhaji Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.