मुकुंदवाडी हत्येतील आरोपी अखेर ७ दिवसांच्या पोलिस कोठडीत; पोलिसांनी दिली १२ कारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:26 IST2025-07-05T12:25:32+5:302025-07-05T12:26:56+5:30
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने पोलिसांनी केली तयारी, तब्बल १२ मुद्यांच्या आधारे मांडली कोठडीची गरज

मुकुंदवाडी हत्येतील आरोपी अखेर ७ दिवसांच्या पोलिस कोठडीत; पोलिसांनी दिली १२ कारणे
छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी स्मशानभूमीजवळ झालेल्या नितीन संकपाळ यांच्या हत्या प्रकरणात अखेर ५ आरोपींना न्यायालयाने १० जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. विशेष न्यायाधीश ए. आर. उबाळे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. शुक्रवारी दुपारी आरोपींना एमआयडीसी सिडको पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते.
किरकोळ कारणावरून १९ जून रोजी रात्री नितीन यांच्यासह सचिन संकपाळ आणि दत्ता जाधव यांच्यावर रात्री धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. यात नितिन जागीच मृत्युमुखी पडले तर अन्य दोघे जखमी झाले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी मस्तान ऊर्फ नन्ना हुसेन कुरेशी (२९), समीर खान सरताज खान (१९), बाबर शेख अफसर शेख (३२), साजिद कुरेशी ऊर्फ सज्जू अहेमद कुरेशी (२९) आणि नासीर खान मोहम्मद मुनीर खान (२०) यांना अटक केली. मात्र, पोलिसांनी अटकेची कारणे लेखी स्वरूपात न दिल्यामुळे तसेच नातेवाईकांना अटकेबाबत अधिकृतरीत्या न कळविल्याने न्यायालयाने आरोपींना तांत्रिक कारणावरून जामिनावर मुक्त केले होते.
दुपारी ३ वाजता न्यायालात हजर
गुरुवारी न्यायालयाने आरोपींचा जामीन रद्द करत पुन्हा अटकेची परवानगी दिली. एमआयडीसी सिडको पोलिसांनी शुक्रवारी सकाळीच पाचही आरोपींना हर्सूल कारागृहातून ताब्यात घेत दुपारी ३ वाजता न्यायालयात हजर केले.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांसोबत सल्लामसलत
तांत्रिक त्रुटींमुळे आरोपींना जामीन मिळाल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेतली. त्यांच्या सूचनांनुसार सहायक आयुक्त सुदर्शन पाटील, निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सलग ८ दिवस कायदेतज्ज्ञांसोबत सल्लामसलत केली. कायदेशीर त्रुटी दूर करून आरोपींच्या पुन्हा अटकेसाठी मुद्देसूद मसुदा तयार केला.
१२ मुद्द्यांवर पोलिस कोठडी
शुक्रवारी जवळपास २५ मिनिटे चाललेल्या सुनावणीमध्ये पोलिसांनी आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसह अटकेसाठीचे १२ महत्त्वाचे मुद्दे सांगितले. १० दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
या मुद्द्यांवर होणार तपास
गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करणे, हल्ल्याचा उद्देश काय होता, आरोपी एकत्र कसे आले, कोणाच्या मदतीने पसार झाले, हत्येसाठी चिथावणी कोणी दिली, सदर गुन्हा गंभीर असल्याने पुराव्यांची साखळी जोडून सबळ तांत्रिक, भौतिक पुराव्यांची श्रृंखला जुळवण्यावर पोलिसांचा भर असेल.
नितिनच्या कुटुंबिंयाना न्याय देणार
पूर्वी राहिलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांसोबत सातत्याने संपर्कात होतो. त्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पुन्हा एकदा तयारी केली. आरोपींविरोधात सबळ पुरावे गोळा केले जातील. नितीन व त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त.