मुख्यमंत्र्यांचा निर्णय अडकला लालफितीत; वाहतूकनगरच्या संपादित ६० एकर जागेचाच विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 17:50 IST2025-05-22T17:43:51+5:302025-05-22T17:50:02+5:30

मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय अडकला लालफितीत

MSRDC forgets about 60 acres of land acquired for crore-dollar freight city | मुख्यमंत्र्यांचा निर्णय अडकला लालफितीत; वाहतूकनगरच्या संपादित ६० एकर जागेचाच विसर

मुख्यमंत्र्यांचा निर्णय अडकला लालफितीत; वाहतूकनगरच्या संपादित ६० एकर जागेचाच विसर

छत्रपती संभाजीनगर : शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा वर्षांपूर्वी करोडी येथे मालवाहतूकनगर उभारण्याची घोषणा केली होती. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी म्हणून २४ हेक्टर (६० एकर) जागा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसीच्या) नावावर करण्यात आली. मात्र, कालांतराने या प्रकल्पाचा आणि संपादित जागेचा विसरही प्रशासनाला पडला आहे.

प्रकल्पासाठी आवश्यक जागा मिळाली, निधी मंजूर झाला आणि खासगी संस्थेने आराखडाही तयार केला. पण एमएसआरडीसीच्या मुंबई कार्यालयात तो अहवाल पडून राहिला व पुढील कारवाईसंदर्भात "आम्हाला अपडेट नाही," असे खुद्द स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितल्याने प्रकल्पाच्या दुर्दशेवर शिक्कामोर्तब झाले.

सरकारचा ठोस निर्णय, पण पुढे काय?
छत्रपती संभाजीनगरात ४ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मालवाहतूकनगर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ३ नोव्हेंबर २०१७ रोजी करोडी येथील गट क्र. २४ मधील २४ हेक्टर जागा एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात आली. या प्रकल्पासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला होता.

मुंबई येथील ‘फोरस्टेक’ या खासगी कंपनीची निवड प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून करण्यात आली. कंपनीने आराखडा आणि आर्थिक अहवाल तयार करून तो एमएसआरडीसीच्या मुंबई कार्यालयात सादर केला. पण त्यानंतर सत्तांतर झाले. कोरोना आला आणि प्रकल्पाची फाइल गुलदस्त्यात गेली.

मालवाहतूकनगरची गरज काय?
१) औद्योगिक हब असल्याने दररोज २ ते अडीच हजार मालट्रकची आवक-जावक.
२) त्यातील १२०० पेक्षा अधिक मालट्रक या मुक्कामी थांबतात. मालवाहतूकनगर नसल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला थांबतात व वाहतुकीला अडथळा निर्माण करतात.
३) आजघडीला शहरात २४७ मालवाहतूकदार कार्यरत आहेत.
४) या व्यवसायात दररोज ४० ते ५० कोटींची उलाढाल होते.
५) मालवाहतूकनगर बनले तर तिथे एकाच ठिकाणी सर्व मालट्रक थांबतील व शहरात वाहतूककोंडी होणार नाही.

राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने प्रकल्पाची कोंडी
छत्रपती संभाजीनगरच्या नेतृत्वात राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही. एमएसआरडीसीसारख्या महत्त्वाच्या विभागाचे अधिकारीच प्रकल्पाविषयी ‘अपडेट नाही’ असे म्हणत असतील, तर प्रकल्पाचे भवितव्य काय असेल, याची कल्पना करता येते.

मालवाहतूकदार संघटना मुख्यमंत्र्यांना भेटणार
“मालवाहतूकनगरसाठी जागा, निधी, आराखडा सर्व काही तयार असतानाही हा प्रकल्प का रेंगाळतो आहे, हेच कळेनासं झालं आहे. नागपूर, पुणे, नाशिक प्रमाणे छत्रपती संभाजीनगरलाही ट्रान्सपोर्ट हबची गरज आहे. मागील १५ वर्षांपासून आम्ही यासाठी प्रयत्न करत आहोत. आता स्थानिक लोकप्रतिनिधींना घेऊन येत्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत,” अशी प्रतिक्रिया मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याज खान यांनी दिली.

Web Title: MSRDC forgets about 60 acres of land acquired for crore-dollar freight city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.