छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या ५० जागा वाढणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 18:25 IST2025-12-01T18:20:32+5:302025-12-01T18:25:01+5:30
पुढील शैक्षणिक वर्षापासून वाढीव ५० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या ५० जागा वाढणार!
छत्रपती संभाजीनगर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) ‘एमबीबीएस’च्या जागा २०० वरून २५० पर्यंत वाढविण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी दिली. याशिवाय ‘पीजी’च्या जागाही वाढणार असून, त्या दृष्टीने रुग्णालयात पाहणीसाठी निरीक्षक येत आहेत.
घाटी रुग्णालयात सध्या ‘युजी’च्या म्हणजे ‘एमबीबीएस’च्या २०० जागा आहेत. घाटी रुग्णालयात काही वर्षांत सोयी-सुविधांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ‘एमबीबीएस’च्या ५० जागा वाढविण्यासाठी घाटी रुग्णालयाकडून हालचाली सुरू आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून वाढीव ५० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध होईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
‘टीचिंग हॉस्पिटल’ म्हणून एक पायरी वर
संस्थेतील सुविधा आणि सेवांची गुणवत्ता राष्ट्रीय पातळीवरील निकषांशी जुळवून आणण्याची धडपडही वेगाने सुरू झाली आहे. केवळ जागावाढ नसून घाटीला ‘टीचिंग हॉस्पिटल’ म्हणून पुन्हा एक पायरी वर नेण्याची ही संधी मानली जात आहे. प्रशासन पायाभूत सुविधा, आधुनिक उपकरणे, प्रयोगशाळा, वॉर्ड क्षमता, स्वच्छता, रुग्णांच्या नोंदी यामध्ये सुधारणा करण्यावर भर देत आहे.
‘पीजी’च्या ८५ जागा वाढणार
पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांच्या जागा वाढवण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे. घाटीत सध्या ‘पीजी’च्या २०० जागा आहेत. यात ८५ जागा वाढविण्याचा प्रस्ताव असून, विविध विभागांतील रुग्णसंख्या, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी निरीक्षकांचे दौरे सुरू झाले आहेत. या पाहणीचा अहवाल ‘पीजी’च्या जागावाढीचा निर्णय ठरवणार आहे.
‘जीवरसायनशास्त्र’च्या २ वरून १७ जागा
जीवरसायनशास्त्र विषयाच्या पीजीच्या सध्या २ जागा आहेत. या जागा २ वरून १७ करण्यासाठी निरीक्षकांकडून पाहणी करण्यात आल्याची माहिती डाॅ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.