छत्रपती संभाजीनगरात भटक्या श्वानांसाठी अद्ययावत काळजी केंद्र सुरू; दररोज नसबंदी, रेबिज लसीकरणही होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 20:01 IST2025-08-23T20:00:52+5:302025-08-23T20:01:09+5:30
रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखालील नवीन अद्ययावत श्वान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे

छत्रपती संभाजीनगरात भटक्या श्वानांसाठी अद्ययावत काळजी केंद्र सुरू; दररोज नसबंदी, रेबिज लसीकरणही होणार
छत्रपती संभाजीनगर : भटक्या श्वानांसाठी महापालिकेने रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखाली १ कोटी रुपये खर्च करून अद्ययावत काळजी केंद्र सुरू केले आहे. या केंद्राचे लोकार्पण स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रात आता दररोज मोकाट श्वानांची नसबंदी, रेबिज लसीकरण केले जाईल. डब्ल्यूव्हीएस होप या खासगी संस्थेमार्फत हे काम सुरू राहणार आहे. एका श्वानाची नसबंदी, लसीकरण केल्यास मनपा खासगी संस्थेला १,३०० रुपये देईल.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून, प्रशासक जी. श्रीकांत यांचे त्यांनी अभिनंदन केले. आश्रय हस्त ट्रस्टच्या डॉ. जिगीषा श्रीवास्तव यांनी या केंद्रासाठी १ कोटी रुपये अनुदान दिल्याबद्दल शिरसाट यांनी त्यांचे आभार मानले. प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले, उड्डाणपुलाखाली नशेखोरांचा अड्डा बनला होता. श्वान केंद्रामुळे अड्डा गायब झाला. उर्वरित चार हजार स्क्वेअर फूट जागेवर महानगरपालिकेचा नशामुक्ती केंद्र उभारण्याचा मानस आहे. पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी हा प्रकल्प प्रेरणादायी असल्याचे सांगितले. कार्यक्रमास विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, कार्यकारी अभियंता संजय कोंबडे, अनिल तानपुरे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, मुख्य पशुसंवर्धन अधिकारी शाहेद शेख, होपचे प्रवीण ओहळ आदींची उपस्थिती होती.
श्वान केंद्राची वैशिष्ट्ये
केंद्रात एकूण ३२ पिंजरे असून, प्रत्येक पिंजऱ्यात तीन श्वानांची देखभाल व त्यांच्यावर निगा ठेवण्याचे काम करण्यात येणार आहे. या ठिकाणी निर्बीजीकरणदेखील दोन तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी करणार आहेत. याशिवाय ब्लड टेस्ट, एक्स-रे आणि इतर उपचारांची सुविधा उपलब्ध आहे.