भाजीविक्रेत्याचा मोबाइल चोरीस गेला, वेळीच सीम कार्ड बंद न करणे पडले सव्वादोन लाखांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:30 IST2025-08-08T17:20:50+5:302025-08-08T17:30:02+5:30
मोबाइल चोरीस गेल्यानंतर भाजीविक्रेता सीमकार्ड बंद करायचा विसरल्याने चोरट्यांनी घेतला गैरफायदा

भाजीविक्रेत्याचा मोबाइल चोरीस गेला, वेळीच सीम कार्ड बंद न करणे पडले सव्वादोन लाखांत
छत्रपती संभाजीनगर : मोबाइल चोरीला गेल्यानंतर सीमकार्ड बंद न करणे भाजीविक्रेत्याला चांगलेच महागात पडले. चोराने त्याच मोबाइलमधील यूपीआय ॲपचे पासवर्ड बदलून २ लाख ३८ हजार रुपये लंपास केले. बुधवारी याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अख्तर वजीर खान (४६, रा. फुलंब्री) हे जाधववाडीत भाजीविक्री करतात. २७ जुलै रोजी पहाटे ५ वाजता ते जाधववाडीत भाजीविक्री करण्यासाठी गेले होते. सकाळी ८:३० ते ९:३० वाजेदरम्यान अज्ञाताने त्यांचा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी सिडको पोलिसांनी मोबाइल हरवल्याची नोंद केली. ४ ऑगस्ट रोजी दुपारी अख्तर कामानिमित्त बँकेत गेले होते. तेथे मात्र त्यांना खात्यात केवळ ७५ रुपयेच असल्याचे कळाले. त्यानंतर त्यांना मोबाइल चोरीला गेल्यानंतर सदर चोराने यूपीआय आरआरएन क्रमांकावरून त्यांच्या बँक खात्यातून २ लाख ३८ हजार रुपये काढून घेतल्याचे समजले.
सीमकार्ड बंद केले नव्हते
मोबाइल गहाळ झाल्यानंतर अख्तर यांनी सीमकार्ड बंद केले नव्हते. पोलिसांच्या निरीक्षणानुसार त्यांच्या मोबाइलला पासवर्डदेखील नव्हता. परिणामी, चोर सहज यूपीआय ॲपपर्यंत पोहोचू शकला. सीम बंद नसल्याने मोबाइलमध्ये त्याला बँक खाते, आधार कार्डची माहिती सहज उपलब्ध झाली. त्यावरून त्याने त्याच क्रमांकावर ओटीपी मिळवत पासवर्ड बदलला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला.
नऊ दिवस पैसे काढत होता
चोराने एकाच वेळी पैसे वळते केले नाही. २७ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान त्याने ही सर्व रक्कम विविध खात्यांवर वळती केली.