Raj Thackeray: औरंगाबादमध्ये 13 दिवस जमावबंदी लागू, राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 08:34 AM2022-04-26T08:34:39+5:302022-04-26T09:02:17+5:30

Raj Thackeray: "पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा", राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश.

MNS Chief Raj Thackeray Rally In Aurangabad On 1 May 2022, police imposed section 144 in city for 13 days | Raj Thackeray: औरंगाबादमध्ये 13 दिवस जमावबंदी लागू, राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह...

Raj Thackeray: औरंगाबादमध्ये 13 दिवस जमावबंदी लागू, राज ठाकरेंच्या सभेवर प्रश्नचिन्ह...

googlenewsNext

औरंगाबाद: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणाऱ्या सभेला पाच दिवस शिल्लक राहिले असून अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही.  दरम्यान, आता औरंगाबादमध्ये जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

औरंगाबाद पोलिसांनी काढलेल्या जमावबंदीच्या आदेशानुसार, 26 एप्रिल ते 9 मे या काळात औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू असणार आहे. या आदेशानुसार, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी असेल. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली. पण, आता या आदेशामुळे राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणारी सभा रद्द करावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. 

मनसेकडून औरंगाबादेत होणाऱ्या सभेचा 'टीझर' रिलीज

मनसेने औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेचा टीझर रिलीज केला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा टीझर रिलीज केेला आहे. टीझरसोबत 'चला संभाजीनगर' असे कॅप्शनदेखील देण्यात आले आहे. यावरुन मनसेने या सभेसाठी जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे. 

सभेच्या तयारीला लागा- राज ठाकरेंच्या सूचना
दरम्यान, सभेला परवानगी मिळाली नसली तरीदेखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा असे आदेश ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे. मुंबईत सोमवारी ठाकरे यांच्या हस्ते सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, दिलीप धोत्रे, संदीप देशपांडे आदींची उपस्थिती होती.

अनेकांकडून सभेला विरोध
1 मे रोजी औरंगाबादेत सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर करताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. लहान-मोठ्या पक्ष, संघटनांनी सभेबाबत विरोधाचे हत्यार उपसले आहे. भाजपकडून सभेबाबत अद्याप काही प्रतिक्रिया नाही, तर शिवसेनेने सभेमुळे शहराच्या शांततेला बाधा पोहोचेल अशी भीती व्यक्त केली आहे. मनसेने शहरात वॉर्डनिहाय निमंत्रण पत्रिका वाटप करण्यास सुरुवात केली आहे. काही संघटनांनी सभेला पाठिंबा दिला आहे.

वेळप्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी

परवानगी मिळो अथवा न मिळो सभा होणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. दरम्यान, पोलिसांनी गरवारे स्टेडियमवर सभा घेण्याची सूचना केली, परंतु मनसेने सांस्कृतिक मंडळावरच सभेसाठी हट्ट धरला आहे. मनसेच्या सभेला परवानगी देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने अद्याप घेतलेला नाही. सभेला परवानगी न मिळाल्यास न्यायालयाकडे दाद मागण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

संबंधित बातमी- सभेपूर्वी मनसेला आणखी एक झटका, औरंगाबादचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांचा राजीनामा

Web Title: MNS Chief Raj Thackeray Rally In Aurangabad On 1 May 2022, police imposed section 144 in city for 13 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.