बेपत्ता मुलीचा मृतदेह ४ दिवसांनंतर शेतातील विहिरीत आढळला, छत्रपती संभाजीनगरात खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:27 IST2025-11-15T15:22:31+5:302025-11-15T15:27:57+5:30
चार दिवसांनंतर धक्कादायक बाब उघडकीस, दोन दिवस विहीर तपासूनही मृतदेह दिसला नव्हता; शवविच्छेदनानंतर होणार मोठा खुलासा

बेपत्ता मुलीचा मृतदेह ४ दिवसांनंतर शेतातील विहिरीत आढळला, छत्रपती संभाजीनगरात खळबळ!
छत्रपती संभाजीनगर : आई-वडील कामावर गेले होते, घराजवळच खेळणारी अवघी पाच वर्षीय राशी चव्हाण अचानक बेपत्ता झाली आणि चौथ्या दिवसी तिचा मृतदेहच मिळाला. मंगळवारी दुपारी हरवलेली ही चिमुकली शुक्रवारी दुपारी परिसरातीलच एका विहिरीत तरंगताना आढळली. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी या विहिरीत तपासणी करण्यात आली होती. तेव्हा मात्र मृतदेह मिळून आला नव्हता. शनिवारी शवविच्छेदनानंतर अधिक गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मध्य प्रदेशातील सेंधवा येथील राम चव्हाण पत्नी, मुलांसह पिसादेवी- पळशी रस्त्यावरील ओंकार सिटी बांधकाम प्रकल्पावर काम करून तेथेच वास्तव्यास असतात. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ते कामात व्यस्त असताना त्यांची पाच वर्षांची मुलगी राशी शाळेतून घरी परतली. त्यानंतर लगेच ती समवयस्क मुलींसोबत खेळायला गेली. मात्र, दुपारी ३ वाजता तीच्या आई-वडिलांनी तीला आवाज दिला; पण राशी दिसून आली नाही. आसपास शोध घेऊनही ती दूरपर्यंत राशी सापडली नाही. त्यानंतर कुटुंबाने तत्काळ चिकलठाणा पोलिसांकडे धाव घेतली. पाच वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे, पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे, सहायक निरीक्षक समाधान पवार, पवन इंगळे, उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे यांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली.
सायंकाळी ६ वाजता आढळला मृतदेह
बुधवारपासून स्थानिक गुन्हे शाखा, चिकलठाणा पोलिसांची चार पथके तिचा शोध घेत होते. शुक्रवारी ती परिसरातीलच एका किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी पुन्हा दुपारपासून त्याच परिसरात राशीचा शोध सुरू केला. राशी राहत असलेल्या घरापासून साधारणत: २०० ते ३०० मीटर अंतरावरील पारधेश्वर मंदिराजवळील शेतात पाण्याने भरलेली विहीर आहे. काही कर्मचाऱ्यांनी तेथे पाहिले. तेव्हा सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास राशी त्या विहिरीत तरंगताना आढळली. ही धक्कादायक बाब कळताच पोलिस अधिकाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली.
श्वान पथक, अग्निशमन विभागाला पाचारण
पोलिसांकडून घटना कळताच अग्निशमन अधिकारी विजय राठोड, सोमीनाथ भोसले, अग्निशामक जवान अनिकेत लांडगे, राजू राठोड, लालचंद दुबेले, विलास झरे, सी. आर. गीते यांनी धाव घेतली. जवळपास अर्ध्या तासानंतर राशीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर श्वानाने परिसरात काही माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अंतरावर जाऊन श्वान घुटमळले.
मृतदेह कुजलेला, शाळेचा गणवेश, शूजही तसेच
राशीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. तीन ते चार दिवसांपासून तो पाण्यात पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तिच्या अंगावर शाळेचा गणवेश, शुजही तसेच होते. मुलीचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. हे पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले होते.