तीन चौकशांमुळे मंत्री संजय शिरसाट यांचा आवाज बंद : अंबादास दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 18:50 IST2025-10-09T18:49:44+5:302025-10-09T18:50:02+5:30
एक नाही दोन नाही तर सध्या त्यांच्या तीन चौकशा सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा सकाळचा मीडिया वार्तालाप बंद आहे.

तीन चौकशांमुळे मंत्री संजय शिरसाट यांचा आवाज बंद : अंबादास दानवे
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे सामाजिक न्याय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गैरव्यवहाराच्या एक, दोन नाही तर तीन-तीन चौकशा सुरू आहेत. त्यामुळेच त्यांचा रोज सकाळचा माध्यमांवरील आवाज बंद झाला आहे. ते सध्या गप्प आहेत, असा खोचक टोला माजी विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी बुधवारी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला.
मध्यंतरी मंत्री शिरसाट यांच्यावर विरोधी पक्षाने गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. मात्र काही दिवसांपासून विरोधीपक्ष त्यांच्याबाबत मवाळ झाल्याचे चित्र आहे, असे विचारले असता दानवे म्हणाले, आम्ही मंत्री शिरसाट यांची विविध प्रकरणे बाहेर काढली होती. त्यावर राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले होते. माझ्या माहितीनुसार सध्या त्या प्रकरणात चौकशा सुरू आहेत. एक नाही दोन नाही तर सध्या त्यांच्या तीन चौकशा सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा सकाळचा मीडिया वार्तालाप बंद आहे.
दानवे मूर्खांच्या नंदनवनात
तीन चौकशा सुरू असल्याचा दानवे यांनी केलेला आरोप चुकीचा आहे. दानवे हे सध्या मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही.
- संजय शिरसाट, पालकमंत्री