रोजचे वाद मिटेनात, संतापून प्रेयसीच्या घरातच प्रियकराने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2021 18:33 IST2021-11-15T18:32:46+5:302021-11-15T18:33:30+5:30
boyfriend committed suicide at his girlfriend's house: प्रेयसीने अनेक वेळा प्रियकराच्या घरी जाऊन तिच्यासोबत राहण्यासाठी गोंधळ घातला होता.

रोजचे वाद मिटेनात, संतापून प्रेयसीच्या घरातच प्रियकराने केली आत्महत्या
औरंगाबाद : प्रियकराने प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना न्यायनगरमध्ये शनिवारी सायंकाळी घडली (boyfriend committed suicide at his girlfriend's house) . प्रेयसीसह तिच्या दोन नातेवाईक महिलांनी त्यास घाटी रुग्णालयात आणून दाखल करीत तेथून पळ काढला. अमाेलराजे भाऊसाहेब चव्हाण (वय ३२, रा. विष्णूनगर, जवाहर कॉलनी) असे मृताचे नाव आहे. अमोलच्या नातेवाईकांनी हा खुनाचा प्रकार असल्याचा आरोप केला.
एका हॉटेलात स्वयंपाकी असलेल्या अमोलराजेचे न्यायनगरातील रेश्मा (नाव बदलले आहे) सोबत प्रेमसंबंध होते. तो विष्णूनगरात आई, वडिलांसोबत राहत होता. त्याची प्रेयसी न्यायनगरमध्ये १५ व १३ वर्षांच्या दोन मुलांसाेबत राहते. या दोघांमध्ये सतत खटके उडत होते. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तो रेश्माच्या घरी गेला. तेव्हाही दोघांत वाद झाला. या वादातून ती दोन मुलांसोबत घरातून बाहेर निघून गेली. तेव्हा घरात एकटाच असलेल्या अमोलराजेने दार बंद करून गळफास घेतला.
हा प्रकार उघडकीस आल्यावर रेश्मासह अन्य दोन महिलांनी एका रिक्षा चालकाच्या मदतीने त्याला घाटीत आणले. घाटीच्या अपघात विभागात अमोलचा मृतदेह टाकून तिघींनी रिक्षाने पळ काढला. अमोलच्या गळ्यावर व्रण असल्यामुळे अपघात विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खुनाचा संशय व्यक्त केला. तिघीही रिक्षातून पसार झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ घाटी चौकीतील पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी अपघात विभागातील सीसीटीव्हीची तपासणी केली, तेव्हा त्यामध्ये रिक्षाचा क्रमांक ठळकपणे दिसून आला. त्यावरून तिघींना पोलिसांनी शोधले. तसेच घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीत गळफास घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मृताच्या घरी येऊन गोंधळ
अमोलच्या वडिलांना अर्धांगवायू असल्यामुळे ते अंथरुणाला खिळून आहेत. तीन बहिणी असून, आई घरकाम करते. सर्व कुटुंबाचा भार अमोलवरच होता. अमोलच्या प्रेयसीने अनेक वेळा त्याच्या घरी जाऊन तिच्यासोबत राहण्यासाठी गोंधळ घातला होता. त्यामुळे अमोलच्या नातेवाईकांसह मित्रमंडळींनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने जमा होऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सहायक निरीक्षक एस. के. खटाणे यांनी त्यांची समजूत काढली. यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार केले.