मराठवाड्यात भरतनाट्यम नृत्यशैली रुजवणाऱ्या मीरा पाऊसकर यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 18:38 IST2021-05-15T18:37:33+5:302021-05-15T18:38:24+5:30
मराठवाड्यात भरतनाट्यम नृत्यशैलीचे पहिले रोप मीरा पाऊसकर यांनी रुजवले. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे.

मराठवाड्यात भरतनाट्यम नृत्यशैली रुजवणाऱ्या मीरा पाऊसकर यांचे निधन
औरंगाबाद : नृत्य शिरोमणी, गुरुवर्य मीरा पाऊसकर (७९) यांचे शुक्रवारी (दि.१४) पहाटे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्याच्या पार्थिवावर सायंकाळी प्रतापनगर समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठवाड्यात भरतनाट्यम नृत्यशैलीचे पहिले रोप मीरा पाऊसकर यांनी रुजवले. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या शेकडो मुली-मुले आज देश - विदेशात नृत्यकलेचा प्रचार- प्रसार करीत आहेत. मीरा पाऊसकर या धारवाड व हुबळी येथे महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या. काही वर्षे प्राचार्य म्हणूनही यशस्वी जबाबदारी सांभाळली. त्यांचे पती बाबूराव पाऊसकर हे बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला होते. त्यांची बदली औरंगाबादमध्ये झाली आणि पाऊसकर कुटुंब शहरात आले. मीरा पाऊसकर यांनी धारवाड येथे गुरू श्रीनिवास कुलकर्णी व उमेश हिरांजाल यांच्याकडे भारतनाट्यमचे शिक्षण पूर्ण केले होते. औरंगाबादेत त्यांनी भरतनाट्यम शिकविण्यास सुरुवात केली. १९७७ मध्ये त्यांनी निर्मलादेवी नृत्यझंकार नृत्यसंगीत अकादमी स्थापन केली. त्यांनी या अकादमीपासून नृत्यशिक्षिका म्हणून आपला नव्याने प्रवास सुरू केला.
भरतनाट्यमसोबतच त्यांनी कुचिपुडी नृत्यशैलीचे शिक्षण दिले. राजीव बालभवनची शाखा शहरात स्थापन केली. इतर कलाप्रकार व विज्ञानामध्ये चुणूक दाखविणाऱ्या मुला- मुलींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. भरतनाट्यमचे प्रशिक्षण देताना त्यांनी प्रयाग संगीत समिती अलाहाबाद, इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय खैरागढ, गांधर्व महाविद्यालय अशा विद्यापीठांशी संस्था संलग्न केली व येथील विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या १०० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी अरंगेत्रम सादर केले. भरतनाट्यमचा प्रसार-प्रचारात मोठे योगदान लक्षात घेऊन इंडियन डान्स अकादमीने त्यांना नृत्य शिरोमणी पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. लायन्स क्लबने उत्कृष्ट शिक्षकाचा ‘द्रोणाचार्य’ पुरस्कार प्रदान केला होता.
राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी गौरविले
मीरा पाऊसकर यांच्या विद्यार्थिनींना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इंद्रकुमार गुजराल, एच. डी. देवीगोडा यांच्या समोर भरतनाट्यमच्या सादरीकरणचा मान मिळाला. त्यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी मीरा पाऊसकर यांच्या भारतीय शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील योगदानचा गौरव केला होता.