वैद्यकीय अधिकारी शलाका पाटील यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 18:09 IST2018-10-08T18:08:03+5:302018-10-08T18:09:48+5:30
डॉ. शलका या बीएएमएस असून त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत होत्या.

वैद्यकीय अधिकारी शलाका पाटील यांची आत्महत्या
औरंगाबाद : फुलंब्री येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. शलाका रमेश पाटील (वय ३८,रा. सिंहगड अपार्टमेंट, तिरूपती एक्झीकेटिव सोसायटी, उल्कानगरी) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, डॉ. शलका या बीएएमएस असून त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत होत्या. त्यांना अकरा वर्षाचा मुलगा आहे. त्यांचे पतीसोबत पटत नसल्याने त्या गेल्या काही वर्षापासून मुलासह उल्कानगरी येथील सिंहगड अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर राहात होत्या. याच अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर त्यांचे माहेर असून तेथे त्यांचे आई-वडिल राहतात. त्यांचा भाऊ नाशिक येथे स्थायिक आहे. रविवारी रात्री त्यांनी आई-वडिलासोबत रात्री गप्पा मारल्या त्यानंतर त्या मुलासह त्यांच्या फ्लॅटमधील घरी गेल्या.
दरम्यान, आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा झोपेतून उठला तेव्हा त्याला डॉॅ.शलका घरात दिसली नाही. बराचवेळ झाला तरी आई दिसत नसल्याने तो तळमजल्यावर राहणाऱ्या आजी-आजोबांच्या घरी गेला आणि आई येथे आली का,असे त्याने त्यांना विचारले. त्यानंतर त्याची आजी आणि आजोबा वरच्या मजल्यावर आले तेव्हा त्यांना बाथरूमचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांनी आवाज देत बाथरूमचे दार ठोठावले मात्र आतून प्रतिसाद आला नाही. शेवटी त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने बाथरूमचा दरवाजा तोडला तेव्हा शलका यांनी शॉवरच्या स्टील पाईपला ओढणीने बांधून गळफास घेतल्याचे दिसले. त्यानंतर शलाका यांच्या गळ्याचा फास काढला आणि समोरच्या हॉलमध्ये आणले. या घटनेची माहिती जवाहरनगर पोलिसांना कळविण्यात आली.