वाळूज एमआयडीसीमधील कंपनीच्या मेडिकल वेस्टमधील एमडी पावडरची परराज्यात तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 11:48 IST2025-06-26T11:46:49+5:302025-06-26T11:48:26+5:30

या प्रकरणी पाच आरोपींना चार दिवसांची पाेलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे

MD powder from medical waste of a company in Waluj MIDC smuggled to other states | वाळूज एमआयडीसीमधील कंपनीच्या मेडिकल वेस्टमधील एमडी पावडरची परराज्यात तस्करी

वाळूज एमआयडीसीमधील कंपनीच्या मेडिकल वेस्टमधील एमडी पावडरची परराज्यात तस्करी

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसीमधील एका फार्मा कंपनीच्या टाकाऊ औषधी रसायनातून काढण्यात येणाऱ्या एमडी ड्रग्सची तस्करी मुंबईसह परराज्यात करण्यात येत होती. त्यामुळे भंगाराचे कंत्राट घेतलेला आरोपी कंपनीतून मेडिकल वेस्ट मार्फत ही पावडर गोदामात आणत होता. तेथून परराज्यातील ड्रग्स तस्करांकडे पुरवठा करत असल्याचे तपासात समजल्याची माहिती एनडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी बुधवारी न्यायालयात दिली.

न्यायालयाने मुख्य आरोपी बबन खान नजीर खान (६५), त्याची दोन मुले कलीम खान बबन खान (४१), सलीम खान बबन खान (३५, तिघेही रा. जुना बाजार), वाहन चालक शफीफुल रहेमान तफज्जुल हुसेन (४५) आणि राज रामतिरथ अजुरे (३८, दोघेही रा. उत्तर प्रदेश) या पाचही जणांना २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

एनडीपीएसच्या पथकाने २१ ते २३ जून या दरम्यान साजापूर चौफुली रस्त्यावरील गोदामात छापा मारून पाच आरोपींना अटक केली. या कारवाईत २ किलो ४७३ ग्रॅम एमडी पावडर, दोन टेम्पो असा १ कोटी ४३ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीना बुधवारी एनडीपीएसच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के आणि त्याच्या पथकाने न्यायालयात हजर केले. बागवडे आणि सरकारी वकील सुधीर बनसोडे यांनी सांगितले की, मुख्य आरोपी बबन खान हा पूर्वी मुंबईच्या गोरेगाव भागात राहत होता. त्याच्याकडे विविध औद्योगिक कंपन्यांचे भंगाराचे कंत्राट होते. त्याच्याकडे २०११ पासून मायलान फार्मा कंपनीचे भंगार उचलण्याचे कंत्राट आहे. ही कंपनी एड्स, कॅन्सर अशा गंभीर आजारावरील औषधी, गोळ्या निर्मिती करते. या कंपन्यांना रसायन बाहेर देता येत नाही. मात्र, खानच्या गोदामात छापा मारल्यानंतर तिथे कंपनीमधून आलेल्या कॅरीबॅगमध्ये गोळ्यांची पावडर असल्याचे उघड झाले. तो गुजरातसह अन्य राज्यांत पुरवठा करत होता. त्याने अनेक व्यवहार बिटकॉईन मार्फत केले.

आरोपींनी पोलिस ठाण्यात व्हीआयपी ट्रीटमेंट का?
आरोपींना वाळूज पोलिस ठाण्यात व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या प्रकरणात पोलिस आयुक्तांनी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: MD powder from medical waste of a company in Waluj MIDC smuggled to other states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.