तलवारीच्या म्यानमध्ये लपवून आणले एमडी ड्रग्ज; ४०० रुपये रोजाने मुलांना केले सप्लायर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 20:01 IST2026-02-02T20:01:05+5:302026-02-02T20:01:14+5:30
अटकेतील आरोपीकडून तलवारीसह आणखी ड्रग्ज जप्त, शहरात ४०० रुपये रोजाने मुलांना केले सप्लायर

तलवारीच्या म्यानमध्ये लपवून आणले एमडी ड्रग्ज; ४०० रुपये रोजाने मुलांना केले सप्लायर
छत्रपती संभाजीनगर : चार दिवसांपूर्वी अटक केलेला कुख्यात गुन्हेगार, शहरातील अमली पदार्थांचा मुख्य तस्कर शेख अशपाक शेख पटेल (रा. चंपाचौक) याचा जिवलग मित्र शेख कलीम शेख सरदार (३५, रा. रवींद्रनगर) याने घराच्या पत्र्यावर तलवारीच्या म्यानमध्ये ड्रग्ज लपवून ठेवले होते. गुन्हे शाखेने शनिवारी तलवारीसह म्यानमधील ३३ ड्रग्जच्या पुड्या जप्त केल्या. त्यात २०.६९ ग्रॅम एमडी ड्रग्ज होते, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.
२४ जानेवारीपासून गुन्हे शाखेची चारपेक्षा अधिक पथके सातत्याने अशपाकचे सर्व रॅकेट मुळासकट संपवण्यासाठी कारवाई करीत होती. यात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली असून अशपाकसाठी काम करणाऱ्या कलिमच्या घरातून २९ जानेवारी रोजी ५३.३२ ग्रॅम एमडी पावडरसह बेहिशेबी ३.२६ लाखांची रोख व २४ कॅरेटचे ८ तोळ्यांचे सोन्याचे दागिने जप्त केले. न्यायालयाने त्याला १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणारा कलिम पोलिस कोठडीत चौकशीत पोपटासारखा बोलायला लागला. जप्त केलेल्या ५३.३२ ग्रॅम एमडी ड्रग्ज व्यतिरिक्त त्याने २०.६९ एमडी पत्र्यावर तलवारीच्या म्यानमध्ये ३३ पुड्या करून लपवले होते. सदर तलवारदेखील त्याने विक्री करण्यास नकार देणाऱ्यांना, पैसे बुडवणाऱ्यांना धमकावण्यासाठी घेतली होती. पोलिसांनी तलवार व ड्रग्ज शनिवारी जप्त केले.
अशपाकचे इंदूर कनेक्शन
शहरात यापूर्वी नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या पातळ औषध, गोळ्यांचा पुरवठा इंदूरहून होत असल्याचे समोर आले होते. यावेळी अशपाक पटेलचेदेखील इंदूर कनेक्शनचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहे. विशेष म्हणजे एमडी सारखे ड्रग्जदेखील अशपाक इंदूरच्या तस्करांकडून मिळवतो. कलिमच्या चौकशीत ही बाब उघड झाली.
४०० रुपये रोजाने मुले, न ऐकल्यास मारहाण
अशपाकने परिसरातील अनेक मुलांना ४०० रुपये रोजाने ऑर्डर पुरवण्यासाठी नेमले होते. अशपाकवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून २०१७ मध्ये छावणीच्या हत्येत तो अनेक वर्षे कारागृहात होता. त्याचीच भीती दाखवून तो धाकदपटशाही करून स्थानिकांकडून हे काम करवून घेत होता. काम करण्यास नकार देणाऱ्यांना तो धमकावून मारहाणदेखील करायचा, असेही अटकेतील आरोपींनी पोलिसांना सांगितले.
अशपाकच्या घराचे डिव्हिआर जप्त
चंपाचौकासह अशपाकचे अन्यत्र दोन ते तीन घरे आहेत. ही घरे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत असून त्याचे संपूर्ण फुटेज अशपाक मोबाइलवर लाइव्ह पाहत होता. पोलिसांनी या सर्व कॅमेऱ्यांचे डिव्हिआर जप्त केले आहे. यात कैद झालेल्या प्रत्येक संशयिताचा आता कसून शोध सुरू आहे.