'आदीयोगी शंकराचे आशिर्वाद सर्वांनाच लाभो!'; सभा संपताच मुख्यमंत्री थेट घृष्णेश्वराच्या चरणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 14:21 IST2025-11-26T14:17:37+5:302025-11-26T14:21:05+5:30
कुंभमेळ्यासाठी आणखी विकास कामांची तयारी, २२५ कोटींच्या कामांना गती, घृष्णेश्वराच्या दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

'आदीयोगी शंकराचे आशिर्वाद सर्वांनाच लाभो!'; सभा संपताच मुख्यमंत्री थेट घृष्णेश्वराच्या चरणी
- सुनील घोडके
खुलताबाद: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सायंकाळी बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घेतले. आदि योगी शंकराचे दर्शन घेऊन ते भारावून गेले होते. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांशी चर्चा करताना, आगामी नाशिक येथील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत वेरूळ परिसरात आणखी विकास कामे करायची आहेत, त्यासाठी देवस्थान ट्रस्टचे सहकार्य अपेक्षित आहे, असे महत्त्वाचे आवाहन केले. तसेच यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्हिजिटिंग बुकमध्ये अभिप्राय नोंदवत, ''आदीयोगी शंकराचे आशिर्वाद सर्वांनाच लाभो'' अशी मनोकामना व्यक्त केली.
राजकीय सभेहून थेट शिवशंकराच्या चरणी
खुलताबाद येथील नगर परिषद निवडणुकीची प्रचार सभा संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सायंकाळी ६:४५ वाजता श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी वेरूळ येथे दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी मनोभावे दर्शन घेतल्यानंतर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने अध्यक्ष कुणाल दांडगे आणि कार्यकारी विश्वस्त योगेश टोपरे यांच्यासह संजय वैद्य, राजेंद्र कौशीके, मिलींद शेवाळे, दीपक शुक्ल, सुधीर टोपरे, सुनील शुक्ल, गणेश वैद्य, सुधाकर वैद्य, उमेश अग्निहोत्री या विश्वस्तांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी फडणवीस यांनी विश्वस्तांशी संवाद साधताना सांगितले की, तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेला सव्वा दोनशे कोटी रुपयांचा निधी प्रगतीपथावर आहे. कुंभमेळ्यापूर्वी ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, कुंभमेळ्यासाठी आणखी विकास कामे करण्याची गरज असून, त्यासाठी ट्रस्टचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांच्यासोबत मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार प्रशांत बंब आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे वेरूळ परिसराच्या विकास कामांना गती मिळणार असल्याची आशा व्यक्त होत आहे.
स्वतःच्या हस्ताक्षरात नोंदवला अभिप्राय
देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या कार्यालयातील व्हिजिटिंग बुकमध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात अत्यंत भावनिक अभिप्राय नोंदवला. "आज श्रीक्षेत्र घृष्णेश्वर येथे प्रत्यक्ष शिवशंकराचे दर्शन घेण्याचा योग आला. भारताच्या ज्योतिर्लिंगांच्या पंरपरेतील हे क्षेत्र अंत्यत उर्जादायी आहे. आदीयोगी शंकराचे आशिर्वाद सर्वांनाच लाभो हिच मनोकामना."