पंचनामे रखडले, शेतकरी हवालदिल! अवकाळीच्या फेऱ्यात मराठवाड्याची १७ हजार हेक्टर शेती उद्ध्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:50 IST2026-04-06T17:45:59+5:302026-04-06T17:50:02+5:30
मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार! १७ हजार हेक्टर शेती उद्ध्वस्त, ४ जणांसह ७७ जनावरांचा मृत्यू

पंचनामे रखडले, शेतकरी हवालदिल! अवकाळीच्या फेऱ्यात मराठवाड्याची १७ हजार हेक्टर शेती उद्ध्वस्त
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात १६ मार्चपासून सुरू असलेल्या सततच्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे बळीराजा पूर्णपणे कोलमडला आहे. विभागातील ७४२ गावांतील २९ हजार ६७६ शेतकऱ्यांच्या सुमारे १७ हजार ३४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, १६ मार्चपासून सुरू झालेल्या या नुकसानीचे पंचनामे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
पिकांची धूळदाण
१८ ते २० मार्च दरम्यान झालेल्या गारपिटीने १२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले होते. ही जखम ताजी असतानाच ३०-३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेला गहू, मका यासह संत्री, आंबा, पपई आणि टरबूज अशा फळपिकांची मोठी हानी झाली आहे. एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ३,३४० हेक्टरवर नुकसान नोंदवले गेले आहे.
जीवित आणि वित्तहानी
नैसर्गिक आपत्ती केवळ पिकांवरच थांबली नाही, तर वीज पडून जालना जिल्ह्यातील दोघांचा आणि बीड जिल्ह्यातील दोघांचा, अशा एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच विभागात ७७ जनावरे दगावली असून यामध्ये ४३ मोठ्या जनावरांचा समावेश आहे. एका घराची आणि गोठ्याचीही पडझड झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशासकीय दिरंगाईवर संताप
एकूण २०९ गावांतील ८,७८० शेतकऱ्यांना नुकत्याच झालेल्या पावसाचा फटका बसला आहे. मात्र, कृषी आणि महसूल विभागाकडून पंचनाम्यांना अपेक्षित गती मिळत नसल्याने मदतीची प्रतीक्षा वाढली आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच झालेल्या या तडाख्याने मराठवाड्याचे ग्रामीण अर्थचक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.