अस्ताव्यस्त पसरलेले औरंगाबाद झालेय मराठवाड्याची ‘मुंबई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:23 IST2019-07-11T00:32:29+5:302019-07-11T14:23:16+5:30
मराठवाड्याची ‘मुंबई’ अशी ओळख या शहराने मिळविली असून, झपाट्याने वाढलेली लोकसंख्या अनेक नागरी समस्यांना आव्हान देणारी ठरत आहे.

अस्ताव्यस्त पसरलेले औरंगाबाद झालेय मराठवाड्याची ‘मुंबई’
औरंगाबाद : ‘वाढता वाढता वाढे....’ या उक्तीनुसार हनुमानाच्या शेपटीप्रमाणे औरंगाबाद शहराची आणि पर्यायाने आपल्या देशाची लोकसंख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज चारी बाजूंनी अफाट पसरलेले औरंगाबाद शहर अगदी २० वर्षांपूर्वीही एवढे विस्तारलेले नव्हते. आज मात्र मराठवाड्याची ‘मुंबई’ अशी ओळख या शहराने मिळविली असून, झपाट्याने वाढलेली लोकसंख्या अनेक नागरी समस्यांना आव्हान देणारी ठरत आहे.
गुलमंडी ही शहराची मध्यवर्ती वसाहत आणि त्याच्या आजूबाजूनेच वसलेले शहर असे जुन्या औरंगाबादचे स्वरूप होते. त्यावेळी उस्मानपुरा, क्रांतीचौक हे भाग म्हणजे खूप दूरचा परिसर मानले जायचे. काळानुसार शहर विस्तारले, वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले लोक येथे स्थायिक झाले आणि आज शहराची लोकसंख्या तब्बल १६ लाखांच्या आसपास पोहोचली आहे.
औरंगाबाद शहराची लोकसंख्या-
वर्ष लोकसंख्या
१९९१ ५ लाख ७३ हजार २७२
२००१ ८ लाख ७३ हजार ३११
२०११ ११ लाख ७५ हजार ११६
२. दरवर्षी अंदाजे ५० हजाराने शहराची लोक संख्या वाढते आहे, असे मानले जाते. त्यामुळे २०१९ यावर्षीची औरंगाबाद शहराची अंदाजित लोकसंख्या १६ लाख एवढी गृहीत धरली जाते.
३. औरंगाबाद शहराचे एकूण क्षेत्रफळ १३८.५ चौरस किलोमीटर असून, ११,५१० लोक प्रतिचौरस किलोमीटर जागेत राहतात.
४. २०११ च्या जनगणनेनुसार शहरातील एकूण साक्षरता ८७. ४९ टक्के एवढी असून, यामध्ये पुरुषांचे साक्षरतेचे प्रमाण ९२. १८ टक्के एवढे असून, महिलांचे साक्षरतेचे प्रमाण ८२. ५० टक्के आहे.
५. शहरात दर १००० पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण ९२९ एवढे आहे.
६. ० ते ६ या वयोगटामध्ये लिंग गुणोत्तर प्रमाण दर १००० मुलांमागे ८७१ मुली एवढे आहे.
पाणी पडतेय अपुरे-
शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या जायकवाडी धरणाचे बांधकाम १९७६ साली पूर्ण झाले. तत्कालीन लोकसंख्येनुसार हा जलसाठा पुरेसा होता; पण आता मात्र शहराच्या वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला असून, उन्हाळ्यात तर शहराला तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
कचरा समस्या-
सव्वा वर्षापूर्वी शहरात निर्माण झालेल्या कचरा प्रश्नामुळे औरंगाबाद शहराला थेट जगाच्या नकाशावरच नेऊन ठेवले होते. या प्रक रणात शहराच्या प्रतिमेची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे साधारणपणे ४३० मेट्रिक टन कचरा शहरात दररोज निर्माण होत आहे. या कचºयाची विल्हेवाट लावणे हा प्रशासनासमोरील एक गंभीर प्रश्न आहे.
वाढते प्रदूषण
शहरात स्मार्ट बस अवघ्या काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या असून, लोकसंख्येच्या तुलनेत त्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे शहरात अजूनही खाजगी वाहनांचा वापर करणाऱ्यांचीच संख्या सर्वाधिक आहे. यामुळे दुचाकी आणि चारचाकीधारकांची संख्या लक्षणीय वाढली असून, याचा परिणाम वाढत्या प्रदूषणाच्या रूपात शहरवासीयांना भोगावा लागत आहे. जालना रस्त्यावर दिवसभर दिसून येणारी प्रचंड वाहतूक पाहून शहरातील वाढत्या लोकसंख्येचा लगेच अंदाज येतो.
पार्किंग सुविधाच नाही-
लोकसंख्या आणि वाहनधारकांची संख्या एवढी जास्त असणाºया या शहरात गुलमंडी, पैठणगेट अशी मोजकी ठिकाणे सोडली तर वाहनतळच उपलब्ध नाहीत. सिडकोसारख्या नव्या शहरातही पार्किंगची सुविधा उपलब्ध नसून जुन्या शहरात तर अरुंद रस्ते आणि दाट लोकवस्तीमुळे वाहनतळच नाहीत.