छत्रपती संभाजीनगरात अनेकांनी लुटले संस्कृतीचे सोने; रामलीला मैदानासह पाच ठिकाणी रावणदहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 19:37 IST2025-10-03T19:36:56+5:302025-10-03T19:37:47+5:30
४६ वर्षांची परंपरा कायम; ‘प्रभू श्रीरामचंद्र की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

छत्रपती संभाजीनगरात अनेकांनी लुटले संस्कृतीचे सोने; रामलीला मैदानासह पाच ठिकाणी रावणदहन
छत्रपती संभाजीनगर : ‘प्रभू श्रीरामचंद्र की जय’, ‘अध्योध्यापती रामचंद्र की जय’, या गगनभेदी जयघोषांत हजारो रामभक्तांच्या अलोट गर्दीच्या साक्षीने विजयादशमीनिमित्त शहर परिसरासह वाळूजमध्ये पाच ठिकाणी रावणदहन गुरुवारी सायंकाळी जल्लोषात पार पडले.
सुमारे ४६ वर्षांपासून सिडकोतील एन-७ रामलीला मैदानावर उत्तर भारत संघ रावणदहन करीत आहे. प्रमुख पाहुणे ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, आ. संजय केणेकर यांनी भाषणातून उपस्थितांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उत्तर भारत संघाचे आर.एल. गुप्ता, एन.के. गुप्ता, शेखर देसरडा, अरविंद माछर, बच्चूसिंह लोधी, ओमीराम पटेल, विनोद दीक्षित, लक्ष्मीनारायण शर्मा, रवींद्र तांगडे, सूरजनसिंह, बच्चूसिंग राजपूत, पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. रावणदहन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
फटाक्यांची आतषबाजी...
उत्तरमुखी रावण व मेघनाथच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत दहन करण्यात आले. त्यानंतर अनेकांनी एकमेकांना आलिंगन देत विजयादशमीच्या शुभेच्छा व शमींची (आपट्याची) पाने देऊन सीमोल्लंघन केले. ६६ व ६० फूट उंचीचे पुतळे मैदानात होते. पुतळ्यांभोवती पारंपरिक पद्धतीने रिंगणासह ढोल- ताशांचा गजर सुरू होता. फटाक्यांच्या आकर्षक आतषबाजीत लख्ख प्रकाशाने मैदान न्हाऊन निघाले. उत्तर प्रदेशातून आलेल्या कारागिरांनी रावण व मेघनाथचा पुतळा तयार केला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तर भारत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शास्त्रीनगर, मयूरनगर
गारखेडा परिसरातील शास्त्रीनगरात गृहनिर्माण संस्थेने रावणदहन केले. यावेळी सुहास लंके, अरविंद पाठक, विश्वनाथ दाशरथे, विश्वंभर चव्हाण व इतरांची उपस्थिती होती. मयूरनगरात नवरात्र दुर्गा महोत्सव समिती, शिवतेज प्रतिष्ठानने ४५ फुटी रावणाचा पुतळा उभारला होता. तेथे दहनापूर्वी तेथे वानरसेना मिरवणूक काढण्यात आली.
बजाजनगर वाळूज
बजाजनगर येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर रामलीला मैदानात प्रभू श्रीराम-रावण युद्धाचे सादरीकरण झाले. फटाक्यांच्या आतषबाजीत ६५ फूट उंच रावणाच्या पुतळ्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते दहन करण्यात आले. पंडित हरिश्चंद्र उपाध्याय यांच्या मार्गदर्शनात ३० कलाकारांनी रामलीलेचे सादरीकरण केले. खा. भागवत कराड, विजया शिरसाट, हर्षदा शिरसाट, माजी महापौर विकास जैन, हनुमान भोंडवे, सुनील काळे, दशरथ मुळे, विष्णू जाधव यांच्यासह श्रीराम जानकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर.के. सिंह, ज्योतिस्वरूप मित्तल, राघवेंद्र सिंह, उदयप्रताप सिंह तोमर, शैलेंद्रसिंह तोमर, बच्चा सिंह, कैलास यादव, नरेंद्रसिंह यादव आदींची उपस्थिती होती.