मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार
By बापू सोळुंके | Updated: September 17, 2023 15:45 IST2023-09-17T15:44:29+5:302023-09-17T15:45:14+5:30
१७ दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे यांचे वजन सुमारे सात ते आठ किलो कमी झाले.

मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणासह अन्य मागण्यासाठी १७ दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील हे रविवारी शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. डॉक्टरांच्या पथकांनी त्यांच्या विविध तपासण्या करून त्यांना आंतररुग्णविभागात दाखल करुन घेतले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २९ ऑगस्ट ते १५सप्टेंबरपर्यंत जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा बांधवांनी आमरण उपोषण केले. हे आंदोलन चिरडण्यासाठी पेालिसांनी त्यांच्यावर लाठी हल्ला आणि गोळीबार केला होता. यात अनेक आंदोलनकर्ते गंभीर जखमी झालेले आहेत. या आंदोलकांवर शहरातील उल्कानगरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
१७ दिवस उपोषण केल्यामुळे जरांगे यांचे वजन सुमारे सात ते आठ किलो कमी झाले. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मुंबई येथे उपचारासाठी येण्याचे सांगितले होते. तेव्हा त्यांनी माझे गावकरी जेथे ॲडमिट आहेत, त्या हॉस्पिटलमध्येच मी उपचार घेतो, असे सांगितले होते. त्यानुसार जरांगे आज दुपारी १ वाजता या रुग्णालयात दाखल झाले.
यावेळी पोलीस सरंक्षणात आलेल्या जरांगे यांच्यासोबत त्यांचे भाऊ नवनाथ जरांगे, पुतणी डाॅ. पूजा जरांगे, मुलगा शिवराज, अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक पाटील , आप्पासाहेब कुढेकर आणि शेकडो मराठा सेवक आले आहेत. डॉ. अमोल खांडे, डॉ.अभिमन्यू माकणे ,डॉ.उमेश काकडे आणि डॉ.विनोद चावरे यांचे पथक त्यांच्यावर उपचार करीत आहेत. त्यांच्या रक्ताच्या तपासण्या आणि सोनोग्राफी तपासणी करण्यात आली.