सत्तारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; पंचायत समिती सभापती पदी अनिता बनकरांची बाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 18:01 IST2026-03-10T16:57:54+5:302026-03-10T18:01:26+5:30
शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स, अखेर भाजपने सत्ता खेचून आणली! सिल्लोड पंचायत समितीत शिंदेसेनेचा पराभव

सत्तारांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी; पंचायत समिती सभापती पदी अनिता बनकरांची बाजी
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर): संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या सिल्लोड पंचायत समितीवर अखेर भारतीय जनता पक्षाने आपला झेंडा फडकवला आहे. भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर यांच्या पत्नी अनिता सुरेश बनकर यांची सभापती पदी, तर भगवान शेनफड आहेर यांची उपसभापती पदी निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजपने १० विरुद्ध ८ मतांच्या फरकाने शिंदेसेनेच्या उमेदवारांचा पराभव केला.
अटीतटीची लढत आणि मतदान प्रक्रिया
मंगळवारी सकाळी ११:४५ वाजता सभापती पदासाठी भाजपच्या वतीने अनिता बनकर आणि शिंदेसेनेच्या वतीने सुरेखा शिंदे यांनी अर्ज दाखल केले होते. उपसभापती पदासाठी भाजपचे भगवान आहेर आणि शिंदेसेनेचे निजामखा पठाण रिंगणात होते. दुपारी २ वाजता विशेष सभेला सुरुवात झाली. १८ सदस्यांच्या उपस्थितीत हात उंचावून मतदान घेण्यात आले, ज्यामध्ये भाजपच्या दोन्ही उमेदवारांना १० मते मिळाली, तर शिंदेसेनेच्या उमेदवारांना ८ मतांवर समाधान मानावे लागले.
भाजपचा जल्लोष आणि मिरवणूक
निवडणूक अधिकारी निलेश अपार यांनी दुपारी ३ वाजता अधिकृत विजयाची घोषणा केली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी पंचायत समिती परिसरात फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करत मोठा जल्लोष केला. नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या निकालामुळे सिल्लोडच्या स्थानिक राजकारणात भाजपची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.