मका उत्पादकांना क्विंटलमागे ६०० रुपयांचे नुकसान; शासकीय खरेदी केंद्र सुरु नसल्याने शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लुबाडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 18:55 IST2021-05-08T18:54:35+5:302021-05-08T18:55:33+5:30
केंद्र सरकारने खरेदी केंद्र १ मे २०२१ पासून सुरू करून ३० जून २०२१ पर्यंत मका खरेदी करण्यात येईल असे जाहीर केले होते.

मका उत्पादकांना क्विंटलमागे ६०० रुपयांचे नुकसान; शासकीय खरेदी केंद्र सुरु नसल्याने शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लुबाडणूक
खुलताबाद : तालुक्यात १ मेपासून मका खरेदी केंद्र सुरू करणार सुरू करणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते. यानंतर तालुक्यातील ४१९ शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुध्दा केली. मात्र, शासनाने अद्यापही खरेदी केंद्र सुरू न केल्याने व्यापारी कवडीमोल भावाने मका खरेदी करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध आहेत. शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला हमीभाव मिळत नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने खरेदी केंद्र १ मे २०२१ पासून सुरू करून ३० जून २०२१ पर्यंत मका खरेदी करण्यात येईल असे जाहीर केले होते. मात्र, राज्य शासनाने अद्यापही मका खरेदीकरिता शासन निर्णय काढला नाही. खरेदी सुरू नसल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी मका पिकाचे भाव कमी केले आहेत. त्यामुळे प्रति क्विंटल मागे ५०० ते ६०० रुपयाचे नुकसान शेतकऱ्यांचे होत आहे.
खुलताबाद तालुक्यात ४१९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली असल्याने सदरील शेतकरी मका विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. मागील खरेदीत ऑनलाइन नोंदी असताना बऱ्याच शेतकऱ्यांना उद्दिष्ट नावाखाली खरेदी पासून वंचित राहावे लागले होते. मका खरेदी सुरू झाली नाही तर ऑनलाइन नोंदी करून सुद्धा खरेदी न झाल्यास शासनाने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी काही शेतक-यांनी केली आहे.
खुलताबाद तालुका खरेदी विक्री संघाशी संपर्क साधला असता शासनाचा आदेश नसल्याने मका खरेदी सुरू नाही आदेश येताच मका खरेदी तात्काळ सुरू होईल अशी माहिती देण्यात आली. तर सुलतानपूर येथील शेतकरी अनिल पाटील श्रीखंडे म्हणाले, सध्या बाजारात शेतक-यांची मका अंत्यत कमी किंमतीत खरेदी केली जात असल्याने शासनाने मका खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. ३० जून खरेदीची अंतिम तारीख असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.