महावितरणची दिरंगाई जीवावर बेतली; जमिनीलगत लोंबकळणाऱ्या वीज वाहिनीने घेतले शेतकऱ्याचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 19:25 IST2021-12-29T18:59:09+5:302021-12-29T19:25:06+5:30
शेतात अनेक दिवसांपासून विद्यूत तारा लोंबकळत होत्या. या तारांच्या बाबतीत अनेक वेळा महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना कळविण्यात आले होते. मात्र, सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले.

महावितरणची दिरंगाई जीवावर बेतली; जमिनीलगत लोंबकळणाऱ्या वीज वाहिनीने घेतले शेतकऱ्याचे प्राण
वैजापूर ( औरंगाबाद ) : शेतात जमिनीलगत लोंबकळणाऱ्या विद्यूत तारांना चिकटून एका तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे आज सकाळी तालुक्यातील संवदगाव येथे उघडकीस आले. रामेश्वर बाळू रिठे (१९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी विज वितरण कंपनीचे वायरमन, कनिष्ठ अभियंता व उप अभियंता या तिन जणांविरुद्ध पोलीसात गून्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर रिठे याच्या गट नंबर २६३ मधील शेतात अनेक दिवसांपासून विद्यूत तारा लोंबकळत होत्या. या तारांच्या बाबतीत अनेक वेळा महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना कळविण्यात आले होते. मात्र, सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, मंगळवारी रात्री वीज असल्याने रामेश्वर शेतातील कांद्याच्या पिकास पाणी देत होता. यावेळी जमिनीलगत लोंबकळत असलेल्या विद्यूत तारेला त्याचा संपर्क होऊन मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली.
या प्रकरणी दिपक अशोक रिठे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महावितरणचे वायरमन भुजाडे, कनीष्ठ अभियंता गव्हाड व उप अभियंता राहुल बडवे या तीन जणांविरुद्ध युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.