भाजप मेळाव्यात मांगल्याच्या दिव्याला ‘लायटर’चा अग्नी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 19:51 IST2019-10-01T19:47:23+5:302019-10-01T19:51:32+5:30
सिगारेट पेटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लायटरचा उपयोग

भाजप मेळाव्यात मांगल्याच्या दिव्याला ‘लायटर’चा अग्नी
औरंगाबाद : कुठल्याही साहित्यिक, राजकीय अथवा इतर कोणताही परिसंवाद, शिबीर घेण्याचा कार्यक्रम असो, त्याचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्याची सांस्कृतिक परंपरा आहे. दीप प्रज्वलन हे मांगल्याचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. परंतु सोमवारी भाजपने घेतलेल्या युवा संवाद कार्यक्रमात या मांगल्याच्या प्रतीकाला (दीप प्रज्वलित करण्यासाठी) आगपेटी, मेणबत्तीऐवजी सिगारेट पेटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लायटरचा उपयोग करण्यात आला.
भाजपने ‘भगवान कॉलेज आॅफ फार्मसी’येथे कॉफी विथ युथ या युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. युवकांशी संवाद साधण्याच्या या कार्यक्रमाचे दीप प्रज्चलन करण्यासाठी मेणबत्ती आणि माचीस कुठे आहे, म्हणून राज्यमंत्री अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, म्हाडाचे सभापती संजय केणेकर, प्रवीण घुगे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सचिन झवेरी, उपमहापौर विजय औताडे आदी सर्वजण इकडे तिकडे पाहू लागले. पण मेणबत्ती काही उपलब्ध झाली नाही. काहींनी कार्यकर्त्यांना मेणबत्तीसाठी आवाजही दिला. मेणबत्ती येत नसल्याचे पाहून शहराध्यक्ष तनवाणी यांनी खिशातून सिगरेट पेटविण्यासाठी असणारा लायटर काढला आणि पुढे होत स्वत:च समईच्या वातीला अग्नी दिला. तनवाणींचा हा पवित्रा पाहून केणेकर ‘हे काय चालले आहे’, असे म्हणू लागले. इतक्यात तनवाणींनी लायटर सावेंकडे देण्याचा प्रयत्न केला. सावे यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर डॉ. कराड यांनीही लायटरनेच दीप प्रज्वलन केले. लायटरने दीपप्रज्वलन केल्याचा प्रकार समोर जमलेल्या युवकांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पहिल्यांदाच पाहिल्याने तेही अवाक झाले. काही तरुणांना हा प्रकार पाहून हसू फुटले.