देवगडतांड्यावर मुलभूत सुविधांसह शासकीय योजनांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 03:36 PM2019-09-27T15:36:07+5:302019-09-27T15:38:47+5:30

मतदारसंघ : औरंगाबाद पश्चिम : निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदान मागणाऱ्या राजकीय टोळ्या येतील

Maharashtra Assembly Election 2019 : Devgadatanda awaits government plans with infrastructure | देवगडतांड्यावर मुलभूत सुविधांसह शासकीय योजनांची प्रतीक्षा

देवगडतांड्यावर मुलभूत सुविधांसह शासकीय योजनांची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देलोक प्रतिनिधींनी समस्या जाणून घेतल्याचे येथील कोणालाच आठवत नाही.

औरंगाबाद : डोंगर माथ्यावर नैसर्गिक संपन्नता लाभलेल्या देवगडतांडा परिसरात कायमस्वरूपी पाणी पुरवठ्याची सोय शासनाने केली नसल्याने ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर विसंबून राहावे लागत आहे. पाण्यासह सर्वच मूलभूत सुविधांसह शासनाच्या योजनांची सतत प्रतीक्षा करावी लागते. 

निवडणुकीनंतर ५ वर्षांत तत्कालीन खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट अथवा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आदींसह अन्य मंत्रिमहोदयांनी डोंगरावर येऊन नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचे येथील कोणालाच आठवत नाही. पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्यांच्या फेऱ्या अधूनमधून होतात. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा मतदान मागणाऱ्या राजकीय टोळ्या येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच गतवर्षी योजनेतून कचनेर डीएमआयसीला जोडणारा डांबरी रस्ता झाल्याने दळणवळणाची अडचण संपली आहे; परंतु पाण्यासाठी तांड्यावरील नागरिकांना शहरातून जार विकत आणून पाणी पिण्याची वेळ आली आहे. पाण्याच्या टँकरची अखेरची फेरी गेल्या आठवड्यात शिवगडतांडा येथे आली. पश्चिम मतदारसंघातील शेवटच्या टोकाच्या तांड्यात शिवगडचा समावेश होतो. वीजपुरवठा खंडित झाल्यास अनेकदा कॉल करून लाईनमनला बोलवावे लागते. डोंगरमाथ्यावर अनेक मोबाईलची सेवा नॉटरिचेबल असल्याने अशा वेळी महत्त्वाचा संपर्क साधणे अशक्यच. 

युवक बेरोजगारांचे थवे
येथील प्रत्येक कुटुंबातील मुले-मुली सुशिक्षित आहे. शासनाने युवकांसाठी किमान कौशल्यावर आधारित उपक्रम राबवून स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, असे अनिकेत जाधव, शुभम राठोड,चरण राठोड, आदिनाथ राठोड, अभिषेक जाधव आदींचे म्हणणे आहे.  

पाण्यावाचून हाल
पश्चिम मतदारसंघातील शेवटच्या टोकाचे गाव शिवगडतांडा मानले जाते. येथे नवीन उपक्रम शासनाने राबवून शासन दरबारी लोकप्रतिनिधीने लक्ष घालून पाणी प्रश्न सोडविण्याची गरज होती. - रुक्मिणीबाई राठोड

डोक्यावर आणतो पाणी
म्हातारपणात डोक्यावर हंडा घेऊन दूरवरून पाणी शेंदून किंवा जुन्या टाकीपासून डोक्यावर वाहून न्यावे लागते, शहराच्या जवळ असलो तरी पाणी नाही मिळत. - बेबीबाई राठोड 

आरोग्य केंद्र नाही
दूषित पाण्यामुळे मुले व महिला आजारी पडतात त्यांच्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाचे पथक येथे तपासणीसाठी फिरकत नाही. शहरातील दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते. - जनाबाई चव्हाण

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : Devgadatanda awaits government plans with infrastructure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.